डोंबिवली : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बदनामी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करणार्या डोंबिवलीतील तरुणाला अटक करण्यात आली. शिंदे गटातील
शिवसैनिकांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न करणे आणि राजकीय गटात द्वेषभावना निर्माण करण्याचा प्रयत्न
करणार्या डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात राहणार्या एका तरुणाविरुद्ध विष्णूनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकाने तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोस्ट करणार्या तरुणास अटक केली आहे.
शशांक माणगावकर (39, रा. साई सिध्दी विनायक, उमेशनगर, डोंबिवली-पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डोंबिवलीतील पदाधिकारी संतोष चव्हाण यांनी ही तक्रार केली आहे. आरोपी शशांक माणगावकर यांनी शुक्रवारी त्यांच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतात काम करत असतानाच्या छायाचित्रावर मुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी होईल अशा पद्धतीने गाळलेल्या जागा भरा अशा पद्धतीने छायाचित्र ओळ दिली होती.
या छायाचित्र आणि त्याखालील ओळीने राजकीय द्वेषभावनेचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. या पोस्टमुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. तसेच शशांकने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी शेरेबाजी करुन त्यांचीही बदनामी केली आहे. संतोष चव्हाण
यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी विष्णूनगर पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी शशांकची फेसबुक पानावरील लिखाणाची खात्री करून त्याला अटक केली.