ठाणे; दिलीप शिंदे : राज्यात भाजपाची 51 टक्के ताकद निर्माण व्हावी याकरिता भाजपकडून संघटनात्मक बांधणी केली जात असून त्याकरिता महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेतेही गळ्याला लावण्याच्या रणनीतीवर संघटनात्मक काम केले जात आहे. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा
राज्यभर दौरा सुरू असून त्यांच्यापुढे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील गटबाजी संपविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी बावनकुळे यांना मीरा- भाईंदरच्या आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता गटात समेट घडवून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी नऊ आमदार हे भाजपचे आहेत. त्यातील आमदार गीता जैन या भाजपच्या बंडखोर आमदार आहेत. मीरा -भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव करून माजी महापौर गीता जैन यांनी विजयी पताका फडकविली आणि भाजपच्या दोन गटातील संघर्ष शिगेला पोहोचला. आमदार जैन यांना शिवसेनकडून रसद पुरविण्यात येऊ लागली. पुढे त्यांनी महाविकास आघाडीला साथ दिली. राज्यातील सत्ता बदलानंतर जैन या शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेल्या आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्या.
दरम्यानच्या काळात भाजपमध्ये मेहता यांच्यापेक्षा जैन यांचे वर्चस्व वाढले आणि दोन्ही गटांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला. जैन या जरी अपक्ष असल्या तरी त्यांचे सर्व कार्यकर्ते हे भाजपचे पदाधिकारी आहे. परिणामी जैन-
मेहता गटांमधील संघर्ष हा प्रदेश नेतृत्वाकडे गेला. असेच शह-काटशहाचे राजकारण सुरू राहिले तर आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जबरी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता
येत नाही. म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मेहता-जैन यांच्यातील वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.