ठाणे : डोंबिवलीजवळ खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू | पुढारी

ठाणे : डोंबिवलीजवळ खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

डोंबिवली;  पुढारी वृत्तसेवा :  डोंबिवली जवळच्या ग्रामीण पट्ट्यात असलेल्या संदप ते भोपर गावांदरम्यान खदानीमध्ये बुडून दोघा मुलांचा मृत्यू झाला. तर याच खदानीत बुडालेल्या अन्य चौघा मुलांना वाचविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. मे
महिन्यात याच खदानीमध्ये 7 मे रोजी दोन महिलांसह तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.

आयुष मोहन गुप्ता (14) आणि अंकुश मिलिंद केदारे (13) अशी या दुर्दैवी मुलांची नावे असून ही दोन्ही मुले डोंबिवली जवळच्या आयरे गावातील ज्योतीनगर झोपडपट्टीत राहणारी आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने आयरे गावातील ज्योती नगर झोपडपट्टीमध्ये राहणारे आयुष गुप्ता आणि अंकुश केदारे हे दोघेजण दुपारच्या सुमारास सायकल घेऊन खदानीच्या परिसरात गेले होते. या दोन मुलांसह आणखी चार जण त्यांच्यासोबत होते. खदानीतील पाणी पाहून या मुलांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र खदानीतील
खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पाण्यात बुडाले. गलका झाल्याने तेथील काही ग्रामस्थांचे लक्ष बुडणार्‍या मुलांकडे गेले.
बुडणार्‍या मुलांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी खदानीच्या दिशेने धाव घेतली. मात्र ग्रामस्थ त्या मुलांपर्यंत पोहोचण्याआधीच ही मुले पाण्यात
बेपत्ता झाली. ग्रामस्थांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.

त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अतुल आवटे (17), कीर्तन म्हात्रे (13), पवन चव्हाण (11) आणि परमेश्वर घोडके (12) या चार जणांना
वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तर बेपत्ता झालेल्या आयुष गुप्ता आणि अंकुश केदारे या दोघांचा शोध घेण्यासाठी
अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू ठेवली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर या दोघांचेही मृतदेह हाती लागले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आयुष गुप्ता आणि अंकुश केदारे या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या
रुक्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिले.

या खदानीमध्ये पोहण्यास मनाई आहे. मात्र अनेकदा लहान मुले, तरुण मंडळी या ठिकाणी पोहण्यासाठी जात असतात. खोल पाण्याचा अंदाज नसल्यने, तसेच पोहता येत नसल्यामुळे मानवहानी होऊ शकते. त्यामुळे वारंवार दुर्घटना घडत असल्याने काळाचा डोह म्हणून
समजल्या जाणार्‍या संदप ते भोपरच्या खदानीच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाच महिन्यांनी पुनरावृत्ती :

याच पट्ट्यात असलेल्या नदिवली- संदप गावच्या खदानीत 7 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास मिराबाई सुरेश गायकवाड (55) अपेक्षा
गौरव गायकवाड (28) मोक्ष मनीष गायकवाड (22), मयुरेश मनीष गायकवाड (8) आणि सिद्धेश कैलास गायकवाड (12) या एकाच घरातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. देसले पाड्यातील गायकवाड कुटुंबीयांपैकी मिराबाई आणि अपेक्षा या दोघीजणी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी पाण्यात उतरलेल्या मयुरेश आणि मोक्ष यांनी गटांगळ्या खाल्ल्यामुळे आजी मिराबाई आणि अपेक्षा या दोघी त्यांना वाचवण्यासाठी पाण्याच्या दिशेने धावल्या. मात्र मयुरेश आणि मोक्ष हे दोघे आजी मीराबाई आणि
अपेक्षा यांच्या हाती लागले नाहीत. हे दोघे चिमुरडे खोलवर पाण्यात बेपत्ता झाले. त्यांना वाचवण्यासाठी केलेल्या मिराबाई आणि अपेक्षा याही बेपत्ता झाल्या. या घटनेनंतर देसले पाड्यावर शोककळा पसरली होती

Back to top button