

भाईंदर; राजू काळे : मिरा-भाईंदर महापालिकेकडून मृतदेहांवरील मुखाग्नीसाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रथमच विद्युत दाहिनीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी एकूण 18 पैकी 5 मुख्य स्मशानांची निवड करण्यात आली असून याच स्मशानांमध्ये सुरू असलेल्या एलपीजी दाहिन्यांचे सीएनजी दाहिन्यांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. यातील भाईंदर पश्चिमेकडील स्मशानात येत्या 6 महिन्यांत पहिली विद्युत सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दैनिक पुढारीला दिली.
शहरातील स्मशानांमध्ये लाकडांवर मुखाग्नी दिला जात असल्याने येथून बाहेर पडणारा धूर आसपासच्या लोकवस्तीत पसरुन तेथील लोकांना त्रास होतो. हा धूर थेट वर सोडण्यासाठी पालिकेने काही स्मशानभूमीत एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था केली आहे तर काही स्मशानभुमीतील धूराचा प्रश्न जैैसे थे आहे. लोकांमधील वाढत्या जनजागृतीमुळे अनेकजण गॅस दाहिनीवर मृतदेहांना मुखाग्नी देऊ लागले असले तरी हि दाहिनी अनेकदा बंद ठेवली जात असल्याने तेथील नियमिततेला गालबोट लागते.
पालिकेने भाईंदर स्मशानभूमीत एलपीजी गॅसवरील एकमेव दाहिनी सुमारे 10 वर्षांपुर्वी सुरू केली. यानंतर टप्प्याटप्प्याने बंदरवाडी, काशिमीरा, पेणकरपाडा व मीरारोड स्मशानात एलपीजी दाहिनी सुरू करण्यात आल्या. यासाठी प्रत्येक स्मशानात सुमारे 20 ते 30 व्यावसायिक एलपीजी सिलेंडर्स बसविण्यात आले आहेत. एका एलपीजी दाहिनीला सुमारे 20 ते 25 लाखांचा खर्च आल्याचे सांगण्यात येत आहे.
सीएनजी गॅस पाईपद्वारे पुरविली जात असल्याने तिचा पुरवठा निरंतर सुरू राहतो. यामुळे कोणत्याही मृतदेहाला मुखाग्नी देताना गॅस पुरवठ्यात खंड पडणार नाही. तसेच या गॅसचा दर एलपीजी सिलेंडर पेक्षा कमी असून तो पालिकेला सवलतीच्या दरात मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात पालिकेचा खर्च वाचणार आहे. मात्र या गॅसच्या पुरवठ्यात अडचण आल्यास अथवा दाहिनीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याला पर्याय म्हणून पालिकेने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर विद्युत दाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगामार्फत पालिकेला प्राप्त झालेल्या 30 कोटी निधीतून सुमारे अडीच कोटींचा खर्च एका विद्युत दाहिनीवर खर्च केला जाणार आहे.