Fardin Packer : ‘पीएफआय’च्या संशयित फरदिन पॅकरला कल्याणमधून घेतले ताब्यात | पुढारी

Fardin Packer : 'पीएफआय'च्या संशयित फरदिन पॅकरला कल्याणमधून घेतले ताब्यात

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेल्या पीएफआय या देशविघातक दहशतवाद्यांना अर्थ सहाय्य पुरवल्याच्या आरोप असलेल्या संघटनेचा संशयित सक्रिय कार्यकर्ता फरदिन पॅकर (Fardin Packer) याला मंगळवारी (दि.२७) पहाटे त्याच्या घरातून ताब्यात घेतले. कल्याणच्या रोहिदास वाड्यात घुसून ही कारवाई स्थानिक बाजारपेठ पोलीस आणि खंडणी विरोधी पथकाने संयुक्तरित्या केली. या कारवाईनंतर रोहिदास वाडा परिसरात खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अर्थात पीएफआय या कुख्यात वादग्रस्त संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेने अर्थात एनआयए धरपकड सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील साऱ्या यंत्रणांना ॲलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांनीही या संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर करडी नजर रोखली आहे. जिल्ह्यातील संशयित पट्ट्यात पोलिसांनी पसरलेले खबऱ्यांचे जाळे, तांत्रिक विश्लेषण संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे.

कल्याण पश्चिमेकडील रोहिदास वाड्यात फरदिन पॅकर (Fardin Packer) हा कुटुंबीयांसह राहतो. पीएफआय या वादग्रस्त संघटनेशी त्याचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आला. त्यानुसार त्याच्यावर नजर ठेवण्याच्या ठाणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या. पीएफआयशी संबंध असल्याची खात्री पटल्यानंतर स्थानिक बाजारपेठ पोलिस आणि खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी पहाटे फरदिन पॅकरला तो गाढ झोपेत असताना ताब्यात घेतले. फरदीन हा त्याच्या आई आणि पत्नीसह रोहिदास वाड्यातील आझाद चाळीत राहत आहे. अनेक वर्षांपासून तो सामाजिक चळवळीत सक्रिय होता, अशी माहिती समोर आली आहे.

मात्र, त्याचा दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अर्थात पीएफआय या वादग्रस्त संघटनेशी संबंध कसा आला ? या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत त्याने काय काय उपद्व्याप केले? याचा खंडणी विरोधी पथक शोध घेत आहे. स्थानिक चौकशीनंतर त्याला केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

फरदीनने कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मात्र, चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे त्याच्या आई, पत्नी व नातेवाईकांच्या नजरा लागल्या आहेत. तर पोलीस याविषयी काहीही सांगण्यास तयार नाहीत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, अशा प्रकरणात संबंधिताचा काही सहभाग आढळून आला. तर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली जाते.

फरदीनला पोलिसांना ताब्यात घेताच तो राहत असलेल्या रोहिदासवाडा परिसरात एकच खळबळ माजली आहे. चार वर्षापूर्वी इराकमधील इसीस या अत्यंत क्रूर दहशतवादी संघटनामध्ये सहभागी होण्यासाठी याच कल्याणमधील ४ तरुण गेले होते. दहशतवाद विरोधी तपास यंत्रणांनी हा प्रकार उघड केल्यानंतर कल्याण शहरात खळबळ उडाली होती. त्या ४ मधील एक तरुण भारतात परतला आहे. या घटनेनंतर आता पीएफआयचा कार्यकर्ता कल्याणमध्ये वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button