ठाणे : वेदांता प्रकल्पावरून भाजप-शिवसेना आमनेसामने | पुढारी

ठाणे : वेदांता प्रकल्पावरून भाजप-शिवसेना आमनेसामने

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व युवासनेच्या वतीने ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मात्र याचवेळी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी देखील या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे सेना-भाजप आमने सामने आल्याचे पाहावयास मिळाले.

या प्रसंगी शिवसेनेने ईडी सरकार हाय हायच्या घोषणा दिल्या, तर भाजप महिला पदाधिकार्‍यांनी देश का नेता कैसा हो… नरेंद्र मोदी जैसा हो… अशा घोषणा दिल्या. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना व युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा, असे नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असून त्यासाठी शनिवारी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्वाक्षरी मोहिमेत शिवसेनेचे खासदार राजन विचारे, महिला आघाडी अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रात 30 मे 2019 च्या दिवसाची आठवण करून दुसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेताना आम्हा देशवासीयांना ग्वाही दिली होती की, देशाच्या संविधानाचा आदर करून कोणताही पक्षपातीपणा न करता देशातील सर्व जनतेच्या विकासासाठी कार्य करीन परंतु आज आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक लाख रोजगार निर्मिती होणारा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प अचानक गुजरातला नेल्याने महाराष्ट्रावर एक प्रकारचे अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी

या स्वाक्षरी मोहीमच्या वेळेस भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी हजर झाल्या होत्या. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी देखील स्टेशन बाहेर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिला पदाधिकारी येताच, ईडी सरकार हाय हायच्या घोषणा शिवसेनेकडून देण्यात आल्या. तर भाजपने देखील कुणाचे सरकार आपले सरकार, देवेंद्रजी आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या. या निमित्ताने उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

Back to top button