ठाणे : आनंद दिघें यांनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला ठोकले टाळे | पुढारी

ठाणे : आनंद दिघें यांनी सुरू केलेल्या व्यायामशाळेला ठोकले टाळे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सावरकर नगर येथे 25 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यायाम शाळेला पालिकेने टाळे ठोकले आहे. या व्यायामशाळेचे सात महिन्यांचे भाडे थकल्यामुळे तसेच अनधिकृत बांधकाम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. मात्र ही व्यायामशाळा चालवणारे शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे शिवसैनिक असल्याने शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ठाण्याच्या सावरकर नगर या भागात 25 वर्षांपूर्वी 1 हजार चौरस फुटांच्या जागेत व्यायामशाळा आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या व्यायामशाळेची देखभाल शिवअभिमान व्यायाम मंदिर संस्थेच्या वतीने केली जाते. कोरोना संकटाच्या काळात दोन वर्षे ही व्यायामशळा बंद असल्याने सात महिन्यांचे सुमारे 65 हजार रुपये भाडे थकले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकार्‍यांची भेट घेत थकीत भाड्यापैकी 15 हजार रुपये भरले आणि उर्वरित रकमेसाठी 15 दिवसांची मुदत घेतली. या घटनेला चार दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी दुपारी महापालिकेचे 30 कर्मचार्‍यांचे पथक सावरकर नगरमध्ये आले आणि संस्थेच्या पदाधिकार्‍यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व्यायामशाळेला थेट सील ठोकले.

ठाकरेसमर्थक म्हणून कारवाई

ठाकरे समर्थकांवर यापूर्वीही पालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. व्यायामशाळा सील करण्याची कारवाईही अशाच प्रकारची असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. व्यायामशाळेचे भाडे थकले होते. तसेच पालिकेने दिलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी महेश आहेर यांनी दिली.

Back to top button