ठाणे : भिवंडीत भंगार वाहनांमुळे अपघात वाढले | पुढारी

ठाणे : भिवंडीत भंगार वाहनांमुळे अपघात वाढले

भिवंडी; संजय भोईर :  भिवंडीत दहा दिवसांपूर्वी एका मुदतबाह्य टँकरच्या धडकेत एका दोन वर्षे वयाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मुदतबाह्य टँकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भिवंडी शहरासोबतच लगतच्या ग्रामीण भागात शेलार, खोणी, काटई, कारीवली या ग्रामीण भागात डाईंग तसेच सायजिंग व्यवसाय होत असताना त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा
या मुदतबाह्य टँकरमधून होत आहे. परंतु याबाबत ओरड जरी नेहमीच होत असली तरी कारवाई मात्र शून्य असेच काही चित्र दिसून येत आहे.

भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत मोठ्या संख्येने यंत्रमागाला पूरक असा डाईंग तसेच सायजिंग व्यवसाय केला जातो. या डाईंग तसेच सायजिंग कारखान्यांकरता मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते पाण्याची. पाण्याची गरज भागविण्यासाठी मोर्चा वळतो तो स्थानिक धनदांडग्यांच्या टँकरकडे. त्यांच्याकडील टँकरने पुरवलेलं पाणी घेण्याची जबरदस्ती या डाईंग साइजिंग मालकांवर होत
असताना हे धनदांडगे टँकरमालक भंगार झालेले वापरण्यासाठी अयोग्य असलेले मुदतबाह्य टँकर विकत घेतात. त्याचा वापर स्थानिक वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाच्या संगनमताने करीत असल्याने भिवंडी शहरात अनेक अपघातांना ते कारणीभूत ठरले आहेत. भिवंडी शहरात सुमारे 22 हजार हून अधिक परवानाधारक रिक्षा असताना शेकडो अनधिकृत रिक्षा या सुरू असून त्यामुळे वाहतुकीचा कोंडमारा होतो. तसेच या रिक्षांचा वापर रात्रीच्या चोरीच्या, दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असताना अशा रिक्षांवर
कारवाई करून त्या नष्ट करणे गरजेचे असताना त्या कित्येक वर्षे सांभाळून ठेवल्या जातात का, हा एक प्रश्नच आहे

भंगार डम्परमुळे रस्त्यावर सांडतोय कचरा भिवंडी महानगरपालिका शहरातील जमा होणारा कचरा उचलून डम्पिंग ग्राउंड येथे घेऊन जाण्यासाठी जे वाहन ठेकेदार नेमणूक केले जात आहेत ते वाहन ठेकेदार स्वतःच्या अधिक नफ्यासाठी भंगार झालेले
नादुरुस्त डंपरचा कचरा वाहतुकीसाठी वापरत आहे. त्यामुळे शहरातून हा कचरा घेऊन जात असताना या डंपरमधून कचरा रस्त्यावर सांडतोय.

पोलिसांची नाही राहिली जरब

नादुरुस्त ब्रेक,नादुरुस्त इंजिन असल्या कारणाने अनेक वेळा या कचर्‍याच्या गाड्यांनी सुद्धा अपघात होऊन कित्येकांचे
बळी गेले आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक वाहतूक पोलीस, प्रादेशिक वाहतूक विभाग कार्यालय ठाणे हे या भिवंडी शहरात कधी कारवाई करताना दिसतच नाहीत.आणि हाच सर्वात मोठा कळीचा मुद्दा बनून राहिला आहे. या प्रशासनातील यंत्रणांनी भिवंडी शहरात
सतत कारवाई सुरू ठेवली तर या वाहनांना नक्कीच आळा घालता येईल एवढे नक्की.

Back to top button