कल्याण, पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह अन्य महापालिकांच्या आगामी पालिका निवडणुकांबाबत भाजपा आणि शिंदे गटाबरोबर मनसेची युती करण्याबाबत अंतर्गत गाठी भेटी होत आहेत. दरम्यान, पालिका निवडणुकीबाबत भाजपा शिंदे गटाकडून अद्यापही मनसेला युतीचा प्रस्ताव न आल्याने आम्हाला गृहीत धरू नये. तसेच आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भेटी दरम्यान दिले.
कल्याण डोंबिवली महानगपालिकेतील प्रलंबित विषयांबाबत करण्यासाठी राजू पाटील यांनी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. आयुक्तांच्या भेटी दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवीन सरकार आल्याने मनसेचे नेते आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या भेटी जास्त झाल्या आहेत. मात्र, याचा अर्थ होत नाही की आम्ही त्याच्या बरोबर युती करणार आहोत. केंद्रीय मंत्र्याच्या राज्य भरात होत असलेला दौरा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग असल्याचेही ते म्हणाले.
पूर्वी दसरा मेळाव्याच्या सभेत विचारांचे सोने लुटले जात होते. आता शिवसेनेचे दोन्ही गट दोन विचारांचे सोन काय लुटायचे ते लुटतील. मनसेचा गुढी पाडव्याला मेळावा असतो व त्या दिवशी विचारांचे खरे सोने असते व ते विचार ऐकायला लोक येत असतात, असेही राजू पाटील यावेळी बोलताना म्हणाले.