ठाणे सिव्हिलचा आराखडा मंजूर? | पुढारी

ठाणे सिव्हिलचा आराखडा मंजूर?

ठाणे; दिलीप शिंदे :  ठाणे जिल्हा सिव्हील रुग्णालयाचे 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतरित करण्याबाबत गेल्या 15 वर्षांपासून शासन दरबारी कागदी घोडे नाचत आहेत. भूमिपूजनही झाले मात्र कामाला काही सुरवात झाली नाही. आता एकनाथ शिंदे
हे मुख्यमंत्री झाले असून या 527 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेले
इमारतीच्या आराखड्याची छाननी युद्धपातळीवर सुरू केली असून सप्टेंबर अखेरपर्यंत नव्या रुग्णालयाचा आराखडा मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास निविदा प्रकिया होऊन रुग्णालयाच्या कामाला खर्‍या अर्थाने गती मिळेल.

धोकादायक बनलेल्या ठाणे सिव्हील रुग्णालयात ठाणे, पालघरसह नाशिकमधील रुग्णही उपचारासाठी येतात. मात्र मुंबईप्रमाणे अद्ययावत वैद्यकीय सुविधांच्या अभाव आणि अपुरी जागा ही रुग्णांना त्रासदायक बनलेली आहे. त्यातून राज्यातील
काँग्रेस सरकार, भाजपचे युती सरकार, महाविकास आघाडी सरकार आणि आताचे शिंदे-फडणवीस सरकारने सिव्हिल रुग्णालय व परिसराचा पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय ठाणेकरांना देण्याचा निर्धार केला. त्यानुसार गेल्या आठ वर्षात रुग्णालयाचे नवीन आराखडे तयार झाले आणि काही महिन्यांपूर्वी तिसर्‍यांदा राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली. या सर्व मंजुरी मिळेपर्यंत 900 खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाचा खर्च 314 कोटींवरून 527 कोटींवर पोहोचला आहे. युतीचे सरकारनंतर शासनाच्या उच्चाधिकार समितीने नोव्हेबर 2021 मध्ये 213 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मंजुरी दिल्याने आधीचे 314 आणि आताचे 213 असे एकूण 527 कोटींचा निधी मंजूर केला. 4 मार्च 2022 रोजी आरोग्य विभागाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत सुधारित आरखडा आणि आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली.

त्यात मुख्य रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह इमारत अशा 900 बेडसच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये 200 महिला व बाल रुग्णालय, 200 सुपर स्पेशालिटी बेडस असतील तर उर्वरित 500 बेडस हे सर्वसाधारण बेडस नियोजित आहे.
याशिवाय प्रत्येक विभागात दोन स्वतंत्र आयसीयू उभारण्यात येणार असून तिथे युरोलॉजी, अंकोलॉजी, ओंको सर्जरी सेक्शन, कारडीओलॉजी, कारडीओ व्हॅस्कुलर सेक्शन, नेफ्रॉलॉजी आणि डायलिसिस सेक्शन आशा सगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कर्करोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबधित आजार तसेच हृदयरोगावर उपचार घेणे शक्य
होणार आहे.

खास करून पेशंटला एअर लिफ्ट करून आणण्यासाठी हेलीपॅडची सुविधा देखील असणार आहे. 3 बेसमेंट आणि वर दहा मजल्याच्या दोन इमारती उभारण्यात येणार्‍या नवीन इमारतीची रचना असेल. सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार असून यात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रिया गृह, लेसर उपचार पद्धती, रेटिना उपचार पद्धती आदी आधुनिक उपचारांचा समावेश आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, ऑटोक्लेव्ह रूम, डायलिसिस विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय, सर्व इमारतींसाठी सौर व्यवस्था, सेंट्रल ऑक्सिजन व सेक्शन सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, 100 क्षमतेचे शवागृह आदी सुविधा या नव्या
रुग्णालयात असणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्वच यंत्रणा लागल्या कामाला

दुर्दैवाने 2019 मध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र काम काही झाले नाही. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरीसाठी ठाणे पालिकेला सादर केलेल्या आराखड्यांची छाननी करून आराखडे मंजूर करण्याच्या प्रकियेला गती देण्यात आली आहे. पालिकेचे अधिकारी याच प्रकल्पावर काम करीत असून सप्टेंबर अखेरपर्यंत रुग्णालयाचा आराखडा मंजूर होईल, असा आशावाद शहर विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. तसे झाल्यास तातडीने निविदा प्रकिया सुरू होऊन रुग्णालयाच्या कामाला खर्‍या अर्थाने गती मिळू शकेल.

Back to top button