ठाणे : अंगणवाड्यांच्या भाड्यासाठी सेविकांची पदरमोड | पुढारी

ठाणे : अंगणवाड्यांच्या भाड्यासाठी सेविकांची पदरमोड

ठाणे; अनुपमा गुंडे :  एकीकडे कुपोषणमुक्तीच्या घोषणा करणारे राज्य आणि केंद्र सरकार कुपोषण निर्मूलनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या अंगणवाड्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहे. राज्याच्या शहरी (नागरी) भागातील अंगणवाड्यांचे गेली
6, तर काही ठिकाणी 10 महिन्यांचे भाडे थकल्याने घरमालक सेविकांकडे भाड्यासाठी तगादा लावत असल्याने अनेक सेविका पदरमोड करून भाडी भरत आहेत. शहरी भागातील (नागरी) अंगणवाडी प्रकल्पापुढे अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

तुटपुंज्या जागेत, मंदिरात किंवा इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या घराच्या काही भागात शहरातील (नागरी प्रकल्पात) अंगणवाड्या भरतात. या अंगणवाड्यांसाठी एखाद्या घराचा काही भाग गरजू मालक अंगणवाड्यांना भाड्याने देतात किंवा काही ठिकाणी समाज मंदिर किंवा एखाद्या मंदिरात अंगणवाड्या भरतात. रोज 3 ते 4 तास भरणार्‍या जागेत या अंगणवाड्यात तुटपुंज्या जागेत मुले,
सेविका आणि अंगणवाडीतील साहित्य असते. अंगणवाडीचे भाड्यापोटी केंद्र आणि राज्य सरकार मिळून 750 रुपये भाडे देते. त्यात केंद्राचा वाटा 60 तर राज्याचा 40 टक्के आहे. शहरी भागातील अंगणवाड्यांवर एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे नियंत्रण आहे. राज्याच्या नागरी भागात सुमारे 105 शहरी प्रकल्प आहेत. त्यात महानगरातील अंगणवाड्यांची जागांची समस्या तीव्र होत चालली आहे.

राज्यातील शहरांचे वाढते शहरीकरण, जागांचे वाढणारे दर यामुळे अंगणवाड्यांना शासनाच्या तुटपुंज्या भाड्यात जागा मिळणे दुरापास्त झाले आहे. अंगणवाडी सेविका स्वतःच्या हितसंबंधावर शहरातील मिळावलेली जागा टिकवून ठेवतात, या जागांचे भाडेही सरकार महिनेमहिने थकवत असल्याने सेविकांना घरमालकांच्या किंवा मंदिर असल्यास तिथल्या व्यवस्थापनाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पदरात असलेली जागा टिकवण्यासाठी आणि अंगणवाडी चालविण्यासाठी शहरी भागातील सेविकांना पदरमोड करावी
लागत असल्याचे चित्र आहे.

 

आमच्या अंगणवाडीचे भाडे फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून थकले आहे. भाडे थकल्याने अंगणवाडीची जागा खाली करायला सांगितले. वर्षे – 6 -6 महिने भाडे थकते, आमची अंगणवाडी मंदिरात भरते, पण त्यांनाही आम्हाला भाडे द्यावेच लागते. परवा मी पदरमोड करून भाडे भरले.
– सावित्री वावरे,

भीमनगर – गोराई – मुंबई – अंगणवाडी सेविका आमच्या अंगणवाडीचे गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंतचे भाडे मिळाले आहे. त्यानंतरचे भाडे थकले होते. जागा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही भाडे भरले. शासनाने अंगणवाड्यांच्या जागांसाठी नवीन निकष ठरवले आहेत, पण त्यासंबंधी पुढे काही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शहरी भागातील अंगणवाड्यांना जागांचा आणि त्याच्या भाड्याचा प्रश्न कायमच भेडसावत आहेत.
– नीलम पाटील, अंगणवाडी सेविका – ठाणे

Back to top button