ठाणे : तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी बनणार कल्याण महामंडळ | पुढारी

ठाणे : तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी बनणार कल्याण महामंडळ

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविणे आणि त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी किन्नर कल्याण महामंडळ स्थापनचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

तृतीय पंथीयांच्याही विविध मागण्या प्रलंबित असून किन्नर समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी गेल्या अधिवेशनात त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. किन्नर लोकांना समाजात बहिष्कृत केले जाते किंवा वाईट वागणूक मिळते, किन्नरांना रोजगार नसल्याने ते भीक मागताना ट्रॅफिक सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी दिसतात. किन्नरांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबणा होते. त्यामुळे अशी शौचालये तातडीने बांधणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी किन्नरांसाठीच स्वतंत्र बोगी, सरकारी अर्जामध्ये स्त्री, पुरूष याप्रमाणेच किन्नर असा तिसरा कॉलम असावा, यासह त्यांच्या रोजगार, घर, शिक्षण याबाबत अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत.

किन्नरांच्या हितासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने उत्तर प्रदेश किन्नर कल्याण मंडळाची स्थापना केले आहे. महाराष्ट्र हा प्रगत तर आहेच पण देशाला दिशा दाखविणारे राज्य आहे. त्यामुळे किन्नरांच्या हितासाठी किन्नर कल्याण महामंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामध्ये किन्नरांच्या कल्याणासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे शिक्षण, रोजगार, घर आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी काम करण्यासाठी हे महामंडळ आवश्यक आहे. किन्नरांच्या सर्व मागण्या, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी
कृती आराखडा बनविणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी काम होणे आवश्यक आहे. हे काम समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत होणे आवश्यक असल्याचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या पत्राची दखल घेऊन किन्नरांसाठी
किन्नर कल्याण महामंडळ स्थापन करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याचे
आमदार सरनाईक यांनी सांगितले. या कल्याण महामंडळामुळे किन्नरांना दिलासा मिळणार आहे.

Back to top button