ठाणे : गणेशोत्सव मंडपावर झाड कोसळले, महिलेचा मृत्यू | पुढारी

ठाणे : गणेशोत्सव मंडपावर झाड कोसळले, महिलेचा मृत्यू

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  कोलबाड येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपावर पिंपळाचे मोठे झाड पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. काही समजण्याच्या आताच हे भलेमोठे झाड या मंडपावर मुळासकट कोसळले. पाऊस आल्यामुळे मंडपाच्या बाजूलाच असलेल्या शेडमध्ये मृत महिला आणि त्यांचा मुलगा उभा होता. हे दोघेही या झाडाखाली आल्यानंतर तब्बल 20 मिनिटे ही महिला झाडाखाली तडफडत होती. मात्र 70 पेक्षा अधिक माणसांनी प्रयन्त करूनही हे झाड जराही हलेले नाही. अखेर 20 मिनिटांनंतर अग्निशमन विभागाने येऊन हे झाड हलवले, मात्र तोपर्यंत या महिलेचा तडफडून जीव गेला होता. येत्या डिसेंबरला मुलाचे लग्न बघण्याचे स्वप्न मात्र या महिलेचे अपूर्णच राहिले.

गेले तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळीच मुसळधार कोसळणार्‍या पावसाने विसर्जनाच्या शेवटच्या दिवशीच महिलेचा बळी घेतला आहे. राजश्री वालावलकर (56) असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून त्या रुणवाल गार्डन या ठिकाणी राहायला आहेत. वालावलकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा प्रतीक (32) आणि काव्हीन्सी परेरा (40), सुहासिनी कोलूगुंडे (56), आणि दत्ता जावळे (50) असे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये राजश्री वालावलकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी 8 ते 8.30 च्या दरम्यान कोलबाड येथे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये शेवटची आरती सुरु असताना ही घटना घडली. जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना हे 25 ते 30 वर्ष पिंपळाचे जुने झाड मंडपावर कोसळले. मंडपाच्या बाजूलाच असलेल्या शेडमध्ये 15 ते 20 लोक उभे होते. काही समजण्याच्या आतच पाच ते सहा मजली उंच असलेले हे झाड कोसळले आणि या झाडाखाली राजश्री वालावलकर आणि त्यांचा  मुलगा प्रतीक हे दोघेही अडकले. राजश्री या खाली तर थोडा वर प्रतीक
अडकला. मात्र प्रतीकही अडकल्याने त्याला आईची मदत करता आली नाही. झाड पडल्यानंतर घटनास्थळी असलेले मोठ्या संख्येने असलेल्या नागरिकांनी झाड हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र 70 ते 80 लोकांची ताकदही कमी पडली. राजश्री या आतून आवाज देत होत्या.
मात्र सर्वच जण हतबल होते. अखेर अग्निशमन दल 20 मिनिटांनी आल्यानंतर पटापट फांद्या कापून झाड बाजूला काढले. मात्र त्यांचा
तडफडून मृत्यू झाला होता.

आरती ठरली शेवटची …

रुणवाल नगर या ठिकाणी राहणार्‍या मृत राजश्री वालावलकर या प्रत्येक वर्षी कोलबाड येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनासाठी जात होत्या. या वर्षीही दरवर्षी प्रमाणे त्या विसर्जनासाठी गेल्या. मात्र या वर्षी त्यांच्यावर उत्सवाच्या ठिकाणीच काळाने घाला घातल्याने त्यांची ही आरती शेवटची आरती ठरली. आता त्या कधीच आरतीसाठी येणार नाहीत अशी खंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. शहरातच प्रशासन सुस्त फांदी छाटणीकडे दुर्लक्ष केल्याने दोन वर्षात 1081 झाडे कोसळली तर 670 फांद्या पडल्या आहेत. काही वर्षांपूर्वीच अंगावर झाड पडून एका वकिलाचा तर एका रिक्षाचालकाचा देखील मृत्यू झाला होता. एवढ्या दुर्घटना होऊनही ठाणे
महापालिका प्रशासनाने यापासून बोध घेतलेला नाही. विशेष म्हणजे ज्या सोसायटीच्या परिसरात हे पिंपळाचे झाड येते त्या संबंधित सोसायटीने ठाणे महापालिकेला फांद्या तोडण्यासाठी पत्र देऊनही महापालिकेने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नसल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरातच प्रशासन सुस्त असल्याची टीका आता या प्रकारानंतर होऊ लागली आहे.

झाड बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र 70 लोकांनाही झाड हलले नाही. तो पर्यंत राजश्री वालावलकर या आतून आवाज देत होत्या. याच परिसरात अजूनही काही झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या नाहीत त्यामुळे आणखी जीवितहानी होण्याची वाट प्रशासन बघत आहे का?
– राजू मोरे, प्रत्यक्षदर्शी

दरवर्षी माझी बहीण या सार्वजनिक मंडळाच्या गणेशत्सवाच्या विसर्जनाला जात असे. या वर्षीही नेहमीप्रमाणे ती गेली . मात्र आम्हाला ध्यानी मनी देखील नव्हते असं काही घडेल. आमच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
– राजन खानोलकर,
मृत महिलेचे भाऊ

आणखी किती मृत्यूची वाट बघणार? अशा घटनांना प्रशासनच जबाबदार असून याला प्रशासनाचे धोरण कारणीभूत आहे. फांद्याची छाटणी देखील वेळेवर होत नसून ती तांत्रिक दृष्ट्या योग्य होत नाही. त्यामुळे प्रशासन आणखी किती मृत्यूची वाट बघणार.
– चंद्रहास तावडे,
माजी वृक्षप्राधिकरण सदस्य, ठा.म.पा

Back to top button