ठाणे : भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात गुन्हेगारावर चाकूने सपासप वार | पुढारी

ठाणे : भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात गुन्हेगारावर चाकूने सपासप वार

भवंडी; पुढारी वृत्तसेवा :  भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय एका गुन्हेगारावर अपघात विभागात सर्वांसमोरच चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या रक्तरंजित घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी
शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. मेहमूद सलीम अन्सारी उर्फ (पप्पू
पिल्ला) असे जखमी गुन्हेगाराचे नाव आहे. तर नवाज खान असे हल्लेखोराचे नाव आहे. विशेष म्हणजे पप्पू पिल्लावर अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील गैबी नगर भागात राहणारा नवाज खान आणि त्याच भागात राहणारा मेहमूद सलीम अन्सारी उर्फ (पप्पू पिल्ला) या दोघांमध्ये चोरीच्या वादातून शुक्रवारी सकाळच्या सुमारास भांडण झाले होते. या भांडणात नवाज खान याला पप्पू पिल्लाने बेदम मारहाण केल्याने नवाज हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याची तक्रार घेऊन त्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते. सकाळी 10 वाजता नवाज रुग्णालयातील अपघात विभागात उपचार करत असतानाच या विभागात पप्पू पिल्ला ही आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊन पप्पू पिल्ला हा नावाजवर भडकला आणि तू इथे काय करतो तू पोलीस ठाण्यात जा, यामुळे दोघांमध्ये वाद होऊन रुग्णालयात हाणामारी झाली. त्यावेळी नवाज खानने त्याच्याजवळ बेड खाली ठेवलेल्या धारधार चाकूने पप्पू पिल्लावर सपासप वार केले.

Back to top button