उत्तराखंड : ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावर भाविकांची कार दरीत कोसळली, महाराष्ट्रातील चार भाविकांनी गमावला जीव | पुढारी

उत्तराखंड : ऋषिकेश-बद्रीनाथ मार्गावर भाविकांची कार दरीत कोसळली, महाराष्ट्रातील चार भाविकांनी गमावला जीव

मनोर (पालघर), पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ शुक्रवारी सकाळी कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात मनोरच्या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात महाराष्ट्रातील चार भाविकांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात पालघर तालुक्यातील मनोर गावातील जितेश लोखंडे (वय 42) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. जितेश लोखंडे यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने मनोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कार मधील भाविक बद्रीनाथ धाम दर्शनासाठी जात असताना शुक्रवारी दुपारी ब्रह्मपुरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली होती.

उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्र राज्यातील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते, त्यापैकी एकाचा उपचारासाठी पोहचण्याआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या चारवर पोहचली.

मृत्यू झालेल्या भाविकांमध्ये एक भाविक मनोरचा रहिवासी आहे.मनोरच्या वेळगाव रस्त्यावरील जितेश प्रकाश लोखंडे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राईस मिलचा व्यवसाय असल्याने जितेश लोखंडे मनोर परिसरात ओळखीचे नाव होते. अध्यात्माची आवड असल्याने पंढरीच्या वारीमध्ये तो दरवर्षी सहभागी होत असे. भजन कीर्तनात नियमितपणे भाग घेत होता. मनोर परिसरातील वारकरी संप्रदायात त्याला हभप जितेश महाराज म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि वडील असा परिवार आहे.

Back to top button