ठाणे : बंदुकी दाखवण्यापेक्षा रेल्वे प्रवाशांना सुविधा द्या -जितेंद्र आव्हाड

ठाणे : बंदुकी दाखवण्यापेक्षा रेल्वे प्रवाशांना सुविधा द्या -जितेंद्र आव्हाड
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  भारतातील नागरिक हे गांधीवादी नागरिक आहे ते अतिरेकी नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना बंदुकी
दाखवण्यापेक्षा सुविधा द्या,अन्यथा रेल्वे रुळावर उतरायला तयार आहोत असा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला
दिला आहे. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात एसी लोकलच्या विरोधात झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंदूकधारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा बंदोबस्त पाहून संतापल्या आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला हा इशारा दिला.

कळवा येथे एसी लोकलच्या विरोधात सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे आंदोलन भविष्यात चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या
विषयावरून कळवा येथील अनेक प्रवाशांनी माजी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आव्हाड यांनी हे आंदोलन
सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी आव्हाड यांनी सर्व सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. रविवारी ठाण्यातील मुंब्रा येथे आव्हाड यांनी मुंब्रा प्रवाशांसोबत बैठक पार पडली.मी रेल्वे प्रशासन
अधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी शंभरहून अधिक बंदूकधारी माझ्या बाजूला उभे होते. या भारत देशात लोकशाही
आहे आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे. अधिकार्‍यांची वेळ घेऊन भेट घेण्यासाठी गेलो असतानाही मशीन गन घेऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. आम्हाला घबरवण्याचा प्रयत्न करू नका, या बंदुकीला कोणी घाबरणार नाही, असे आव्हाड म्हणाले.

पोलीस लावायचे, मशीन गन घेऊन यायचं. हे रेल्वे प्रवासी आहेत, अतिरेकी नाहीत. हा महाराष्ट्र आहे, काश्मीर नाही. बंदूक दाखवतात. पण बंदुकीला कोण घाबरत नाही. बंदुकीची गोळी एकदा माराल? गोळी एकदा लागेल आणि एकाला गोळी लागेल. पण एका जणाला गोळी लागली, तर हजार प्रवासी आणि नागरिक गोळी खायला रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळी तेवढ्या गोळ्या तुमच्याकडे नसतील,
असा इशारा आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.

बंदूकधारी पोलिसांना तंबी…

बैठकीच्या ठिकाणी मोठा फौजफाटा आणि बंदूकधारी पोलीस तैनात केल्याचे पाहून आव्हाड यांचा पारा चढला आणि त्यांनी तैनात
करण्यात आलेल्या बंदूकधारी पोलिसांना आपली बंदूक दाखवण्यास सांगितले. त्यावेळी आव्हाड यांनी संताप व्यक्त करून बंदुकीचा धाक दाखवत हिंमत दाखवत असाल तर मी आता तिथे येतो आणि तुमच्या हातातील बंदूक घेऊन दाखवतो, अशी तंबी दिली. या प्रवाशांना बंदुकी दाखवण्यापेक्षा त्यांना सुविधा द्या, असेही आव्हाड म्हणाले.

अन्यथा रुळावर उतरू….

याठिकाणी बसलेले सर्वसामान्य प्रवासी नागरिक आहेत. अतिरेकी नाही. आम्ही आमच्या मागण्यांसाठी याठिकाणी बसलो आहोत. हा भारत देश आहे आणि हे गांधीवादी लोक आहेत. त्यामुळे हे तुमच्या बंदुकीला आणि तुमच्या गोळ्यांना घाबरत नाही. त्यामुळे तैनात करण्यात आलेल्या बंदूकधारी पोलिसांना या ठिकाणाहून हटवा. बंदुकी दाखवून घाबरणार असाल तर आता रेल्वे रुळावर उतरायला तयार असल्याची धमकी वजा इशारा यावेळी आव्हाड यांनी रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशानाला दिला. आव्हाडांच्या संतापानंतर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी बंदूकधारी पोलिसांना बाजूला केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news