ठाणे : गांधारी गणेश घाटावरील गणपती विसर्जन धोकादायक? | पुढारी

ठाणे : गांधारी गणेश घाटावरील गणपती विसर्जन धोकादायक?

सापाड; योगेश गोडे :  गांधारी गावालगद असणार्‍या भंडारी गणेश घाटावर गणेश विसर्जन मार्गावरील जेट्टीच्या दुरवस्थेमुळे मूर्ती विसर्जनात मोठे विघ्न निर्माण झाले आहे. परिणामी मूर्ती विसर्जन करण्यासाठी स्वयंसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी होडीमध्ये घेऊन जात असताना स्वयंसेवकाचा तोल जाऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी वार्तावली आहे. त्यामुळे भक्‍तांच्या भावना उफाळून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली
आहे. त्यामुळेच सागरी विकास विभागाने या जेट्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा गणपती विसर्जनासाठी भंडारी गणेशघाट बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

कल्याण पश्चिम गांधारी परिसरात खाडीकिनार्‍यावरून भिवंडी तालुक्यातील शेकडों गावांमधील नागरिकांचा शिक्षण अथवा रोजंदारीसाठी होडीतून प्रवास केला जात होता. मात्र कल्याण-भिवंडी मार्गाला जोडणारा खाडीकिनार्‍यावरून प्रशस्त पुलाची बांधणी करण्यात आल्याने कल्याण पडघा-नाशिक मार्गे जाणार्‍या हजारो वाहनाची वर्दळ गांधारी पुलावरून सुरू झाली. परिणामी भिवंडी ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांना होडीच्या खडतर प्रवासातून सुटका मिळून गांधारी ब्रिजवरून सुखद प्रवास सुरु झाला. त्यामुळे कल्याण भिवंडी-पडघा
ग्रामीण भागातील नागरिक दैनंदिन कामासाठी कल्याण बाजार पेठेमध्ये येऊ लागले. 2012 साली गांधारी खाडीवर तत्कालीन आमदार
प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने जेट्टीची उभारणी करण्यात आली होती. या जेट्टीमुळे खाडी किनार्‍यावरून मोठ्या प्रमाणावर होड्याची वर्दळ सुरू असते.

अपघातांची दाट शक्यता

कल्याण तालुक्यात खाडीपट्टा विभागातील गावांमधून स्थानिक ग्रामस्थ या खाडीवर व्यवसाय करून उपजीविका करत असतात. यामध्ये वाळू उत्खनन, मासेमारी यांचा समावेश आहे, याकरिता सागरी विकास विभागाकडून जेट्टीची बांधणी करून दिल्या आहेत. ग्रामस्थ छोट्या होड्यातून खाडीतून मासेमारी करत असतात. मात्र सागरी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे गांधारी खाडी किनार्‍यावर बांधण्यात आलेल्या जेट्टीला तडे गेले आहेत. मात्र निकृष्ट बांधकामामुळे ही जेट्टी काही वर्षांतच तडे जाऊन तुटली आहे. यामुळे या जेट्टीवरून चालताना धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने बांधलेल्या या जेट्टीला मधोमध भला मोठा तडा गेला आहे, ही जेट्टी केव्हाही कोसळू शकते. तडा गेलेल्या जागेत पाय अडकून पडण्याचा धोका नाकारता येणार नाही.

 

मी आमदार असतांना गांधारी खाडीकिनार्‍यावर जेट्टी बांधण्यासाठी सागरी विकास विभागाकडून पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यामुळे 2012-13 साली ही जेट्टी बांधण्यात आली. या जेट्टीबद्दल मी पाहणी केली मात्र भरतीचे पाणी जेट्टीवरून वाहत असल्यामुळे जेट्टीला गेलेले तडे दिसून आले नाही. मात्र सागरी विकास विभागाकडे या जेट्टीची पुनःनिर्मितीसाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येईल.
– प्रकाश भोईर, माजी आमदार

Back to top button