ठाणे : गज अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू | पुढारी

ठाणे : गज अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू

मिरारोड; पुढारी वृत्तसेवा :  बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खेळत असताना अंगावर लोखंडी गज पडल्याने 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्‍कादायक घटना काशिमीरा परिसरात घडली. या इमारतीत काम करणार्‍या कामगारांची ही मुले असल्याचे सांगितले जात आहे. काशीमिरा येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी गज पडून एका बालकाचा मृत्यू तर एक बालक गंभीर जखमी झाला आहे.

काशीमिरा परिसरात मौजे घोडबंदर येथे सेवन इलेव्हन कन्ट्रक्शन या कंपनीचे इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना शनिवारी सकाळी 10 वाजता लोखंडी गज हे इमारतीच्या वर घेऊन जाण्याचे काम सुरू होते. यावेळी त्याठिकाणी
लहान मुले खेळत होती. ते लोखंडी गज घेऊन जात असताना त्यातील काही गज हे त्या मुलांच्या अंगावर पडली. या अपघातामध्ये 5 वर्षांचा मुलगा व एक सहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर दोन ऑपरेशन करण्यात आले आहेत

अजून किती निष्पापांचे बळी घेणार ?

यापूर्वी देखील त्या इमारतीच्या बाजूला जे पी इन्फ्रा या विकासकाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी इमारतीवरून काही महिन्यांपूर्वी पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. मिरा-भाईंदर शहरात अशा अनेक घटना घडत आहेत. तरीही विकासक हे या घटना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे कामगार आयुक्त, महापालिका प्रशासन व पोलिसांनी अशा घटना घडणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अजून किती निष्पाप व गरीब कामगारांचा बळी घेणार, असा संतप्‍त
सवाल सामाजिक संस्थाकडून विचारला जात आहे.

Back to top button