ठाणे : बेशिस्त वाहनचालकांचा जिल्ह्यात हैदोस | पुढारी

ठाणे : बेशिस्त वाहनचालकांचा जिल्ह्यात हैदोस

डोंबिवली;पुढारी वृत्तसेवा :  कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या शहाडच्या रेल्वे उड्डाण पुलावरून स्कूटरवरून जात असताना
भरधाव वेगाने आलेल्या टँकरने स्कूटरला जोरात धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिला रस्त्यावर पडली आणि टँकरखाली
चिरडून जागीच ठार झाली. या प्रकरणी टँकरच्या बेजबाबदार चालकाविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली होती. अपघाताच्या या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अवजड वाहनांखाली चिरडून चौघांचा बळी गेला, कल्याण-डोंबिवली महानगपालिका हद्दीतही आतापर्यंत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 जणांचा बळी घेणार्‍या आणि सार्वजनिक रस्त्यांवर निरंकुश थैमान घालणार्‍या बेशिस्त चालकांवर अंकुश कोण आणणार ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

सीतासरण सुदप्रसाद मिश्रा (रा. रांजनोली, ठाकुरवाडा, भिवंडी) असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. कविता प्रशांत म्हात्रे (38,
रा. म्हारळ, कल्याण) असे मृत महिलेचे नाव आहे. कविता म्हात्रे ही स्कूटरवरून रविवारी दुपारी कल्याण-शिळ मार्गावरील टाटा
पॉवर नाक्याजवळ असलेल्या शहीद अरुण चित्ते पेट्रोल पंपावर कर्तव्यावर जाण्यास निघाली होती. शहाड उड्डाण पुलावर आल्यानंतर अचानक बाजूने एम एच 04/एफ डी/7088 क्रमांकाचा टँकर भरधाव वेगात आला. या टँकरने कविताच्या स्कूटरला जोरात धडक दिली. रस्त्यावर पडून टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने कविताचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून टँकरचा पुलावरुन जात असताना वेग तपासला. नियमबाह्य व हयगयीने वाहन चालविल्याने मृत कविताचे पती प्रशांत म्हात्रे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेजबाबदार टँकरचालक सीतासरण मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातील टँकर जप्‍त करण्यात आला असून सपोनि सचिन पत्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ट्रक-टँकरचे 4 बळी

गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात ट्रक/टँकरने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिवाआगासन रस्त्यावर खड्डे चुकवत
दुचाकीवरुन जात असताना एका तरुणाची दुचाकी खड्ड्यात आदळली. रस्त्यावर पडलेला हा तरूण तेथून जात असलेल्या टँकरखाली आला. या टँकरखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. शहापूर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकने दिलेल्या धडकेत कुकांबे गावातल्या शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी येथे टँकरच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने टँकर, ट्रकसारखी
अवजड वाहने चालविणार्‍या चालकांवर आरटीओ, वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Back to top button