सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे म्हणाली, घाबरणार नाही, मी पुन्हा येईन! | पुढारी

सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे म्हणाली, घाबरणार नाही, मी पुन्हा येईन!

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : बेकायदा फेरीवाल्यांविरोधात घाबरून राहिलो तर फेरीवाले फायदा उठवतील. त्यांच्यावर कारवाई करणे हे माझे कामच आहे. त्यामुळे घाबरणार नाही,डगमगणार नाही, पुन्हा कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी मंगळवारी निक्षून सांगितले.

ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमरजीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, अधिकार्‍यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, हल्ला करणार्‍या हल्लेखोरावर कडक कारवाई करू. पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावरील उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेतर्फे केला जाईल.

अधिकार्‍यांवर त्यातही महिला अधिकार्‍यावर हल्ला होण्याची अशी ही शहरातील पहिलीच घटना असून ती अतिशय निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकार्‍यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

फेरीवाल्यांविरोधातील कारवाई सुरू केली असून त्या कारवाईला खीळ बसावी म्हणून हा हल्ला झाला असावा, मात्र यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

हल्लेखोर फेरीवाल्याला मोक्का लावा : प्रवीण दरेकर

ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अमरजीत यादव याच्याविरुद्ध केवळ गुन्हा नोंद करून चालणार नाही, तर त्याच्याविरुध्द तत्काळ मोक्का लावण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

फेरीवाल्याच्या प्राणघातक हल्ल्यात ठाणे पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीण दरेकर यांनी यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एका महिला अधिकार्‍यावर हल्ला करण्याची फेरीवाल्यांची हिंमत कशी होते. ही मस्ती केवळ अनधिकृत काम करून मिळालेल्या पैशाच्या माजातून निर्माण झाली आहे. राजकीय आशीर्वादानेच ही हप्तेबाजी सुरू आहे.

दरेकर म्हणाले, ही घटना अत्यंत चीड आणणारी आणि चिंताजनक आहे. या निमित्ताने फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी समोर आली. गरीब फेरीवाल्यांना संरक्षण देतानाच हप्तेबाजी करून अनधिकृतपणे धंदा करणार्‍या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने फेरीवाला धोरण आणले होते. परंतु या सरकारने हे धोरण अंतिम केले नाही. परिणामी कोणतेही फेरीवाले कुठेही धंदा करण्यासाठी बसतात आणि त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. आता तरी फेरीवाले धोरण तातडीने आणण्याची मागणीही दरेकर यांनी केली.

यावेळी भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, पालिकेचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक नारायण पवार, नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष आणि नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका नंदा पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button