ठाणे : उल्हासनगरच्या नाल्यात सापडला पुरुषाचा मृतदेह | पुढारी

ठाणे : उल्हासनगरच्या नाल्यात सापडला पुरुषाचा मृतदेह

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर कॅम्प पाच येथील दसरा मैदान जवळील नाल्यात एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दसरा मैदानला लागून असलेल्या नाल्याशेजारी दुर्गंधी पसरल्याने महापालिका सफाई कर्मचारी नाला सफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना हा कुजलेले अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याविषयी हिललाईन पोलिसांना माहिती दिली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी रणजित डेरे, पोलीस निरीक्षक पोपट करडकर आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव कचर्‍यात अडकलेला मृतदेह बाहेर काढला. सदरचा मृतदेह हा पुरुषाचा आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सांगितले की या तरुणाच्या हातावर दिपक हे नाव इंग्रजीत गोंदलेले आहे. हा मृतदेह कुजलेले अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटने कठीण झाले आहे. असे असले तरी नजिकच्या परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये व्यक्ती हरविल्याची तक्रार दाखल आहे का, याचा तपास करण्यासाठी टीम बनविल्या आहेत.

Back to top button