ठाणे : आधुनिक युगात आजही काळ्या जादूचा प्रभाव कायम | पुढारी

ठाणे : आधुनिक युगात आजही काळ्या जादूचा प्रभाव कायम

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  एकीकडे औषध तयार करण्यासाठी मांडूळ जातीच्या सापाच्या शरीरातील द्रव्य
उपयुक्त ठरत असल्याने या सापाची तस्करी चोरीछुपे चालत असते, तर दुसरीकडे काळ्या जादूसाठीही या सापाचा वापर केला जात असल्याने अंधश्रद्धाळूंकडून त्याला मोठी मागणी असते. असाच एक साप खरेदी- विक्रीसाठी घेऊन आलेल्या 5 जणांच्या टोळक्याला पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या विशेष पथकाने सापळा लावून जेरबंद
केले आहे. या टोळक्याकडून तब्बल 70 लाखात विक्रीसाठी आणलेले मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला आहे. बहुदा हा साप काळ्या जादू अर्थात धनप्राप्तीच्या प्रयोगसाठी विक्री करण्याकरिता आणला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

निलेश रविंद्र हिलीम (31, रा. मु. जांभळीपाडा ता. वाडा, जि. पालघर), चेतन संजय कांबळे (19, रा. मु. पो. वडवली, ता. भिवंडी), अरविंद शिवराम पंडीत (45, रा. मु. पो. वासुंद्री, टिटवाळा, ता. कल्याण), विशाल यशवंत ठाकरे (28, रा. मनोर ता. जि. पालघर) आणि अनिल संत्या काटेला (35, रा. मनोर ता. जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या
तस्करांची नावे आहेत.

या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात सरकारतर्फे हवा. सदाशिव देवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेकडील पडघा रोडला असलेल्या गंधार नगर येथिल के. एम. अग्रवाल कॉलेजसमोर येणार असल्याची खबर कळताच रविवारी संध्याकाळपासून पूर्व प्रादेशिक विभागाचे
अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस उपायुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सर्जे राव पाटील, पोनि नंदकुमार केचे, पोनि शरद झिने, हवा. संजय पाटील, भालेराव, शेले, देवरे, बोडके व तागड यांनी जाळे पसरले होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्या ठिकाणी तीन दुचाक्यांवरून सहा जण आले. मात्र पोलिसांनी सापळा लावल्याची कुणकुण लागताच या टोळक्याने दुचाक्या फिरवून पुन्हा गांधारी पुलाच्या दिशेने पळ काढला. मात्र या स्कॉडने पाठलाग करून टोळक्याला ताब्यात घेतले.

झटापटीदरम्यान मधुकर नावाचा अन्य एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला. या टोळक्याची झडती घेतली असता त्यांच्याकडील थैलित 2 किलो 600 ग्रॅम वजनाचा व 44 इंच लांबीचा एक दुर्मीळ प्रजातीचा मांडूळ साप आढळून आला. हा साप कोठून आणला? अशी विचारणा करताच टोळके निरुत्तर झाले. हे तरुण तस्करी करणारे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना दुचाक्यांसह खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून
हस्तगत करण्यात आलेल्या या सापाची चालू बाजारभावाप्रमाणे 70 लाख रुपये इतकी किंमत असल्याचे सांगण्यात आले. तर हा साप त्याच्या सुरक्षिततेकरिता कल्याणच्या वनविभाग व मानद वन्यजीव रक्षकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सापाची तस्करीे उघड होण्याची शक्यता

जंगल भागातून साप पकडून तो शहरी भागात आणून काळ्या बाजारात विकण्याचा या बदमाश्यांचा व्यवसाय आहे का? आतापर्यंत या टोळक्याने किती मांडुळ साप विक्री केले आहेत? ते कोणाला हे साप विकत होते? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Back to top button