ठाणे : डोंबिवलीत व्हेल माशाची उलटी जप्‍त | पुढारी

ठाणे : डोंबिवलीत व्हेल माशाची उलटी जप्‍त

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  जगातली सगळ्यात महागडीआणि दुर्मिळ वस्तू म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्हेल माश्याच्या उल्टीच्या तस्करीचे लोण अगदी डोंबिवलीपर्यंत पोहोचले आहे. डोंबिवली कल्याण रोडला असलेल्या एका हॉटेलसमोरून दोघा तस्करांना सापळा लावून जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे.

या दोघा बदमाश्यांकडून 1 कोटी 60 हजार रूपये किंमतीची उल्टी हस्तगत करण्यात आली असून यातील अन्य एकाचा पोलिस शोध घेत आहेत. नंदू किसनदेव राय (28) आणि अर्जुन हरिश्चंद्र निर्मल (26) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. हे दोघेही उल्हासनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे आहेत. कल्याण कोर्टाने या दोन्ही आरोपींना अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

व्हेल माश्याची ही उल्टी मध्यस्थीच्या मार्फत 1 कोटी 60 लाख रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याची कबूली नंदू राय याने दिली. तर अर्जुन निर्मल याच्या अंगझडती दरम्यान सापडलेल्या मोबाईलमध्ये कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड नव्हते. तर नंदू राय याच्याकडूनही दोन सिमकार्ड असलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला. हे दोन्ही मोबाईल आणि व्हेल माश्याची उल्टी रासायनिक पृथक्करण करण्यासाठी मुंबईतील कालिनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. व्हेल माश्याची उल्टीसह रंगेहाथ जेरबंद केलेल्या नंदू राय आणि अर्जुन निर्मल यांच्या जबानीतून आणखी एक नाव पुढे आले.

Back to top button