ठाणे : केडीएमसीच्या कारवाईत गरीब कुटुंब बेघर | पुढारी

ठाणे : केडीएमसीच्या कारवाईत गरीब कुटुंब बेघर

सापाड; योगेश गोडे :  कल्याण पश्चिम दुर्गाडी परिसरात सुनसान रस्त्यावरील फुटपाथवर बांधण्यात आलेल्या शेडवर पालिकेने
केलेल्या कारवाईत एक गरीब मराठी कुटुंब बेघर झाले आहे. ही कारवाई पालिकेकडून भरपावसात करण्यात आल्यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. परिणामी दोन लेकरांना घेऊन कुठे जायचे या भावनेने मायेचे काळीज गहिवरून आले. दैनिक पुढरीशी बोलताना बेघर झालेल्या महिलेला अश्रू अनावर झाले.

कल्याणात रोजगारासाठी आलेल्या चंदा विश्वनाथ चौगुले हे पंढरपूर वरून कल्याणात काही दिवसांपूर्वी आले होते. रोजगार मिळाला नाही म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या प्रश्नाने व्याकुळ झालेले विश्वनाथ यांनी आपल्या गायी मंदिराबाहेर बांधून त्यांना चारा घालण्याचा उपक्रम सुरू केला.यातून त्या गायीचे पोट भरले जात होतेआणि कुटुंबाच्या पालनपोषणाची काही पैसे देखील मिळत होते. या मिळालेल्यापैशातून विश्वनाथ यांनी परिवाराचे पोटभरणे आणि अंग झाकण्यासाठी कापडे खरेदी करून संसार करायला सुरुवात केली. कल्याणातील घरांचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे भाड्याने घर घेणं देखील चौघुले कुटुंबियांना परवडणारे होते. परिणामी दुर्गाडी चौक परिसरात सुमसाम रस्त्याशेजारील वापर न होणार्‍या फुटपाथवर प्लॅस्टिकचे शेड घालून निवार्‍याची व्यवस्था केली.

दिवसभर रोजीरोटी साठी भटकंती करायची आणि मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करायचे. आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी फुटपाथवर बांधलेल्या शेडखाली झोपायचं. रहदारीचा रास्ता नसल्यामुळे या रस्त्यातून एकही वाटसरू चालत जातांना दिसत नाही. मग फुटपाथ वरच्या शेडचाकोणाला कसला त्रास! मात्र पालिका प्रशासनाने या गरीब मराठी कुटुंबावर भर पावसात कारवाई केल्यामुळे हे
कुटुंब आज रस्त्यावर आलं आहे.

या दोन लेकरांना घेऊन एकट्या माय ने कोठे जायचं हा मोठा प्रश्न आता चौगुले कुटुंबियांवर आला आहे. शहरातील फुटपाथवर हजारों अनधिकृत टपर्‍या आणि शेड बांधून फुटपाथ काबीज केले आहेत. त्यांच्यावर पालिका प्रशासनाची कारवाई होतांना दिसत नाही. मात्र
सुनसान रस्त्यावर बांधलेल्या शेडवर कारवाई करून पालिका प्रशासनाला काय साध्य करायचे आहे.

 

माझ्या सासूबाईंनी तब्येत बरीनव्हती. म्हणून माझे पती गावी गेले आहेत. त्या अधिकार्‍यांना विनंती केली की, माझे पती येईपर्यंत आमच्या शेडवर कारवाईकरू नका. मात्र त्यांनी आमचे ऐकले नाही. शेडवर कारवाई करून नवीन ताडपत्री घेऊन गेले.
आता या पावसात आम्ही कुठे जायचे.
– चंदा विश्वनाथ चौगुले,
बेघर झालेली महिला

 

फुटपाथवर शेड बांधून फुटपाथ काबिज करत होते. मुक्या जनावरांना बांधून ठेवत होते. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली.
– सुधीर मोकल,
प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी

Back to top button