डोंबिवली : रिक्षा चालकाला तीन मित्रांकडून मारहाण | पुढारी

डोंबिवली : रिक्षा चालकाला तीन मित्रांकडून मारहाण

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : खडकपाडा रस्‍त्‍याने वेडीवाकडी दुचाकी एक चालक चालवत होता. या चालकास दुचाकी व्यवस्थित चालवा असे सांगणाऱ्या रिक्षाचालक आणि त्यांच्या नातेवाईकास दुचाकी चालकाने बेदम मारहाण केली. यावेळी रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, किरण पवार (वय 27), सुनील कांबळे (25), प्रदीप पवार (22) असे आरोपींची नावे आहेत. रिक्षाचालक विकी पाटील हे मोहाने येथील रिक्षा वाहनतळावर प्रवासी वाहतूक करत होते. यावेळी वाहनतळावर विकी यांचे काका गोरख पाटील हे उभे होते. याचवेळी किरण पवार तेथून रिक्षा प्रवासी यांना कट मारून गेले.

यावेळी जरा व्यवस्थित रिक्षा चालवा असे विकी पाटील यांचे काका गोरख पाटील यांनी त्यांना खडसावले. त्यानंतर किरण आणि गोरख यांच्यात वाद झाला. याचवेळी किरणचे मित्र सुनील आणि प्रदीप तेथे पोहचले. हाच वाद सोडवण्यासाठी विकी पाटील मध्ये पडले. मात्र किरण आणि त्यांच्या मित्रांनी विकी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये विकी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान विकी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा  

Back to top button