ठाणे : किनारपट्टीवरील अडीचशे गावे उधाणाच्या कक्षेत | पुढारी

ठाणे : किनारपट्टीवरील अडीचशे गावे उधाणाच्या कक्षेत

ठाणे; विश्‍वनाथ नवलू :  कोकण पट्ट्यातील पाच जिल्ह्यांतील किनारपट्टीची अडीचशे गावे उधाणाच्या तडाख्यात असली तरी पाऊस सुरू होताच उपाययोजनांची सुरू झालेली लगीनघाई पाऊस संपताच थंडावते. त्यामुळे वर्षानुवर्षांचा हा उधाणाचा प्रश्‍न दिवसागणिक जटिल होत चालला आहे.

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना 720 किमीची किनारपट्टी लाभली आहे. यामध्येपालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयांचा समावेश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबई बुडण्याची शक्यता आहे असे जागतिक पर्यावरण अभ्यासकांनी यापूर्वीच दिला आहे. मात्र मुंबईबरोबरच कोकणातील पाच जिल्ह्यातील किनारपट्टीची गावे भितीच्या छायेखाली आहेत. सिंधुदुर्गातील तेरेखोल, रेडी, निवती, देवबाग, तांबळडेग, रत्नागिरीमधील मुसाकाजी, रत्नागिरी, गणपतीपुळे, दाभोळ, हर्णे, रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, श्रीवर्धन, दिवेआगार, मुरुड, अलिबाग, उरण अशा किनारपट्टीच्या गावांमध्ये दिवसेंदिवस समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने ही गावे धोक्याच्या कक्षेत आहेत. रायगड जिल्ह्यातील खारेपाटमध्ये दहा हजार एकर परिसरात समुद्राचे खारे पाणी शिरले आहे. एका बाजूला खाड्यांमध्ये अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. ठाण्यामध्ये मिरा भाईंदर, दिवा, कळवा तर पालघरमध्ये वसईत खाड्या बुजवून बांधकामे होत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या उधाणाचा फटका किनारी भागाला बसत आहे. त्यामुळे या गावांना पुराचा फटका बसल्याने वस्त्यांना नुकसान पोहोचत आहे.

अलिबागपासून दहा किलोमीटरवरअसलेल्या थेरोंडा, आगलेची वाडी भागात31 जानेवारी 2010 च्या मध्यरात्री समुद्रालाउधाण आले. त्यादिवशी प्रतिपदा होती आणिचंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ दिसत होता.केवळ थेरोंडाच नव्हे तर अलिबाग व रायगडजिल्ह्यातल्या 55 गावांत आणि रत्नागिरीजिल्ह्यातील काही गावांत समुद्राच्या उधाणाचेपाणी वस्त्यांमध्ये घुसले. थेरोंडा,आगलेची वाडी मच्छीमारांच्या मासळी वाळवणी पाण्यात बुडाल्या होत्या. आजूबाजूच्या जमिनीत पूर्ण पाणी घुसले होते. अनेकांच्या घरात पाणी आल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. आगलेची वाडीतील रहिवाशांनी मागच्या दोन वर्षांपासून समुद्राचे पाणी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. वाडीतील अडीचशे घरे आहेत.तर छत्‍तीस बोटी आहेत. मासेमारीसाठी पन्‍नास कि.मी.च्या परिसरात समुद्रात जातो. अलीकडे मासे मिळण्याचे प्रमाण घटले आहे. त्यात हा उधाणाचा फटका बसून नुकसान होत आहे. छोटीकोळंबी, सोडे, वाकटी, चिंबोरे अशा प्रकारचे मासे मच्छीमारांना मिळतात. मच्छिमारीतील नवे तंत्रज्ञान किंवा पारंपरिक बोटींशिवाय अन्य साधनांच्या माहितीचा अभाव या आणि अन्य वस्त्यांवर आजही आढळतो. समुद्रात मासे कुठे आणि किती प्रमाणात आहेत ते शोधणारे व माहिती देणारे वेव्ह रायडर सारखे यंत्र त्यांना ठाऊक नाही. त्याचाही विपरित परिणाम जाणवतो.

रायगडमधील आक्षी भागातही उधाणाने वस्तीत पाणी घुसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही भागात समुद्राला बांध घालण्यात आला,
मात्र त्या बांधावरून पाणी वस्तीत येते. समुद्राची पातळी वाढली तर गावेच्या गावे विस्थापित होतात. अलिबाग परिसरातील मानकोळी आणि गणेशपट्टी ही गावे समुद्राची पातळी वाढल्याने यापूर्वीच् अन्यत्र हलवावी लागली आहेत. मत्स्यविकास विभागातील अधिकार्‍यांना मासे प्रतवारी आणि संख्यात्मक गणनेसाठी नेहमी मच्छिमारी गावांना जावे लागते. मानकोळी व गणेशपट्टी ही दोन गावे समुद्रकिनार्‍यावर होती. परंतू मागच्या काही वर्षांत तेथे सागराच्या लाटा घराघरात घुसू लागल्या. त्यामुळे लोकांनी तात्पुरता बांध घातला. पण तोही टिकला नाही.

समुद्राचे पाणी उधाणात घराघरात घुसण्याचे प्रमाण वाढत गेले आणि त्या परिसरातील लोकांनी जवळपासच्या खेड्यांत स्थलांतर केले, कुणी आपल्या नातलगाच्या गावी गेले. कुणी सरकारने सुचवलेल्या जवळच्या वस्तीवर गेले. समुद्राची पातळी वाढल्याचा थेट फटका
बसून दोन गावे स्थलांतरित करावी लागली. तशीच वेळ मालवण तालुक्यातील तारकर्लीवर आली आहे. तारकर्लीत महाराष्ट्र राज्य पर्यटन
विकास महामंडळाचे रिसॉर्ट पाच हेक्टर जागेवर आहे. 2001 साली सुरू झालेल्या रिसॉर्टमध्ये वीस खोल्या आणि चार बांबू हाऊस बांधल्या. समुद्रकिनारा थेट दिसत असल्याने त्याला परदेशी पाहुण्यांची पसंती आहे. मात्र केलेल्या बांधकामापुढे तीन हेक्टर जमीन मोकळी होती. परंतू समुद्राची पातळी गेल्या दहा वर्षात वाढत गेली आणि अडीच हेक्टर जमीन म्हणजे बीच पाण्याखाली गेला आहे. तो आणखी आत जाऊ नये यासाठी रिसॉर्ट व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणात बांध घालण्याची वेळ आली आहे.

समुद्राच्या लाटा किनारपट्टीतून वेगाने आत येण्याचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत. समुद्र वाढला तर किनारपट्टी लांबेल, पुळणी खचतील, बांध नाहीसे होतील. असा प्रकार अलिबाग परिसरात झाल्याचे आढळून आले आहे. समुद्रपातळी वाढल्याने हे होत आहे. भराव पुन्हा नीट करणे आणि कामाला लागणे हाच पर्याय सध्या सर्वांसमोर आहे. कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी दिसणारे हे चित्र भयावह आणि पुढील संकटाची चाहूल देणारे आहे असेच म्हणावे लागेल.

मुंबई-ठाण्यापासून रेडी-तेरेखोलपर्यंत समुद्र हटवून भराव घालण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झाले आहेत. तो हटलेला समुद्र उधाणावेळी गावात शिरतो. अनेक खाड्यांचे पाणीही वाढते. त्यामुळे खाडीतल्या उद्योगांवर मर्यादा येतात. त्याचाही विपरित परिणाम दिसून येत आहे. शिरोडा भागात अनेक खासगी व्यावसायिकांनी समुद्रकिनार्‍यावर उंचावर बांधकाम केले आहे.

वेंगुर्ला येथील सागरकिनार्‍यावरही निवासस्थानांसमोर मोठे बांध घालून उधाणाचे समुद्राचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. मागचा पुढचा विचार न करता केली जाणारी बांधकामे, प्रचंड वाळू उपसा, समुद्राला येऊन मिळणार्‍या नद्यांच्या प्रवाहात झालेले बदल अशा अनेक कारणांमुळे समुद्रपातळी वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे महत्त्वाचे कारण यामागे असल्याचे स्पष्ट होत असले तरी मानवी हस्तक्षेप आणि अनागोंदीही तितकीच कारणीभूत असल्याचे निश्‍चितपणे सांगता येईल.

Back to top button