ठाणे : ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांची पिळवणूक | पुढारी

ठाणे : ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांची पिळवणूक

सापाड; योगेश गोडे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी दिवसानिमित्त कल्याणात ठेकेदाराकडून कर्मचार्‍यांची पिळवणूक
होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इच्छा नसतांना कामगारांना कामावर यावे लागल्याची खंत कामगार रवींद्र विशे यांनी व्यक्त केली आहे. परिणामी सुट्टी न मिळाल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त तिरंग्याचा
सन्मानाचा कार्यक्रम करता आला नसल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली.

देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कल्याणातील गरीब कामगारांनाही परिवारासोबत तिरंग्याच्या
सन्मानासाठी स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या या इच्छेवर ठेकेदाराकडून पाणी फेडण्यात आले असल्यामुळे गरीब मजूर कामगार हवालदिल झाले आहेत.

कल्याणात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची सिमेंट काँक्रिटिकरण कामे युद्ध पातळीवरmसुरू आहेत. ही कामे करत असताना ठेकेदाराचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे. करोडो रुपयांची कामे ठेकेदार महापालिकेकडून घेत असतो. या कामासाठी ठेकेदार तुटपुंज्या
मानधनात कामगारांना राबवत आहेत. रोजंदारी मिळावी म्हणून कमी पैशात काम करायला ही मजूर तयार होत असतात. मात्र ठेकेदार त्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारत देशाच्या तिरंग्याच्या सन्मानासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत
असताना ठेकेदाराकडून जोर जबरदस्तीने गरीब मजूरांना कामावर गुंतलेले दिसत आहेत. या मजुरांनी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी
विशेष कार्यक्रम राबवण्याची तयारी केली होती. मात्र ठेकेदाराकडून सुट्टी दिली गेली नसल्यामुळे भारतीय तिरंग्याचा सन्मानाचा कार्यक्रम करू शकले नसल्याची खंत मजुरांच्या मनात राहिली. विशेष म्हणजे मोलमजुरी करणार्‍या ठेकेदाराकडून या मजुरांना वेळेत पगार दिला जात नसल्यामुळे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. या संदर्भात पालिका स्मार्ट सिटीचे अधिकारी सुरेंद्र ठेंगले यांच्याशी अधिक माहिती घेण्याचा  प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

15 ऑगस्ट रोजी मजुरांना सुट्टी दिली होती. मात्र थोडं काम होत म्हणून त्यांना बोलावून घेतले आहे. दुपार नंतर त्यांना सुट्टी दिली जाईल.
-खालिद पाटणकर,
मॅनेजर

Back to top button