डोंबिवली: शिवसेना शाखेची दोन गटात विभागणी; ठाकरे गटाच्या कविता गावंड यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

डोंबिवली: शिवसेना शाखेची दोन गटात विभागणी; ठाकरे गटाच्या कविता गावंड यांच्यावर गुन्हा दाखल

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यभरात राजकारणाचे विविध पडसाद उमटत असून मंगळवारी दुपारी डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात जुंपल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बुधवारी मात्र शाखेचे दोन भाग पडले असून अर्ध्या भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि अर्ध्या भागात खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते बसतील, अशी विभागणी करण्यात आली.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात बसणार असल्याचे शिंदे समर्थकांनी सांगितले. मात्र याबाबत ठाकरे गटातील महिला समर्थकांनी कार्यालयाच्या विभागणी संदर्भात कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर डोंबिवली विधानसभा संघटक कविता गावंड यांच्यावर मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत मंगळवारी दुपारी ठाकरे गट व शिंदे गटात जोरदार राडा झाला. शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो काढण्यात आला होता. काल दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटातील कार्यकर्ते शाखेत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फोटो लावण्यात आला. फोटो लावताना दोन्ही गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एकमेकांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती.

पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शिंदे गटातील योगेश जुईकर यांच्या तक्रारीनंतर रामनगर पोलिसांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून बुधवारी शाखेचे दोन भाग पडलेले पाहायला मिळाले. शिंदे समर्थकांनी यासंदर्भात आम्ही आपापसात निर्णय घेतल्याचे सांगितले. तर ठाकरे समर्थकांनी अशा प्रकारचा कोणताही निर्णय आम्ही तरी घेतला नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button