डोंबिवली : मनसे आमदार राजू पाटील यांनी नगरविकास विभागाकडे केलेल्या मागणीमुळे डोंबिवली परिसरातील गावांना पथदिव्यासांठी 27 कोटी 90 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांसह इतर 8 प्रभाग क्षेत्रातील मागणी असलेल्या ठिकाणी पथदिवे व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांसह इतर 8 प्रभागांना पथदिवे व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सन 2015 मध्ये 27 गावे समाविष्ट करण्यात आली. या 27 गावांमध्ये विद्युत पथदिव्यांची व्यवस्था ग्रामपंचायत काळातील आहे. या सर्व पथदिव्यांची व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या सक्षम व पुरेशी नसल्याने, तसेच या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने या भागातील रस्त्यांचा सर्व्हे करण्यात आला. नविन पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन शासनाकडे 27.90 कोटी रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने केडीएमसी आणि आमदार पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मुलभुत सुविधेकरिता निधी मंजूर केला. 27 गावांमध्ये पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच काम हाती घेण्यात येणार आहे.
27 गावांतील मुख्य व अंतर्गत अशा एकूण 207 रस्त्यांवर महापालिकेकडून पथदिवे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये 4 हजार 679 पथदिव्यांचे पोल उभे करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या 27 गावांतील सर्व रस्ते प्रकाशमय होणार आहेत. तसेच महापालिकेच्या अ, ब, क, ड, जे, फ, ग आणि ह या प्रभागातील रहिवासी, माजी नगरसेवक, आमदार यांच्या मागणीनुसार पथदिवे नसलेल्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे नवीन पथदिवे उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रभागनिहाय रक्कम 7.50 कोटी रूपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्रभागातील मागणी असलेल्या ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथदिवे उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.