पिंपरी : पिंपरी ते निगडी या मार्गावर मेट्रो मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्या कामास अडथळा ठरणारे पथदिव्यांचे खांब, ट्रॅफिक सिग्नल हटविण्यात येणार आहेत. त्या कामासाठी 1 कोटी 47 लाख 30 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिका महामेट्रोकडून घेणार आहे.
चिंचवड स्टेशन येथील मदर टेरेसा उड्डाणपूल ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत 4.519 अंतर मार्गिका बांधण्यात येत आहे. मार्गिकेच्या व्हायाडक्टचे काम मेट्रोने सुरू केले आहे. त्यातील पहिल्या पिलरच्या काँक्रीटीकरणाचे काम निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस स्थानक येथे नुकतेच करण्यात आले आहे. या मार्गावर महापालिकेने उभारलेले अनेक पथदिव्यांचे खांब आणि ट्रॅफिक सिग्नल मेट्रो मार्गिकेच्या कामास अडथळा ठरत आहेत. ते खांब व सिग्नल हटविण्यात येणार आहेत. तसेच, वीजपुरवठ्यात बदल करून नव्या ठिकाणी पथदिवे व सिग्नल उभारण्यात येणार आहेत. ते काम महापालिकेचा विद्युत विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 47 लाख 30 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाण पूल या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर पथदिवे खांब आणि ट्रॅफिक सिग्नल हटविण्यात आले आहेत. त्यासाठी महामेट्रोने महापालिकेकडे 3 कोटी 37 हजार 50 हजार 872 रुपये 20 जून 2017 ला जमा केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामासाठी 2 कोटी 32 लाख 55 हजार 671 रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित 1 कोटी 4 लाख 95 हजार 191 रुपये समायोजित करण्यात येणार आहेत. तर, 42 लाख 47 हजार 809 रुपये महामेट्रो महापालिकेकडे जमा करणार आहे. हे काम करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.