चोरीच्या गाड्या ऑनलाईन विकणाऱ्या दोघांना अटक | पुढारी

चोरीच्या गाड्या ऑनलाईन विकणाऱ्या दोघांना अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मोटार सायकल व रिक्षा चोरी करून ती बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून विक्री करणाऱ्या टोळीचा महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख (वय 27) आणि अबूबकर उर्फ जाफर अब्दुल अजीज शेख (वय 22) दोघे रा. कल्याण पूर्व, अडवली यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार रुपये किमतीची ११ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर आणि अबूबकर हे दोघे सख्खे भाऊ अडवली गावातील राम रेसिडेन्सी येथे राहतात. कल्याण पूर्व संतोष नगर येथे राहणारे सुजित घाडगे यांनी त्यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद महात्मा फुले पोलीसांत दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना मोहम्मद अकबर आणि अबूबकर हे गाडीचे आरसी बुक स्वतःच्या नावाचे बनावट आधार कार्ड देऊन गाड्यांची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाचे उमेश माने पाटील, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button