डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना आज (दि.९) दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे भेटण्यासाठी बोलवले होते. यावेळी जवळपास १०० ते १५० शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, यामध्ये कल्याण – डोंबिवलीतील एकही माजी नगरसेवक उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ते माजी नगरसेवक शिंदे गटातच सामील झाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकांमध्ये निवडून आलेले आणि सध्याचे माजी नगरसेवक यांनी शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यानंतर या नगरसेवकांनी आम्ही केवळ शुभेच्छा दिल्या आहेत. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी सावध भूमिका घेतली होती.
मात्र, आज कल्याण डोंबिवली येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर बोलवण्यात आले. त्यावेळी जवळपास १५० कार्यकर्ते आणि पदाधिकारी मातोश्रीवर गेले. मात्र, यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे कोणतेही माजी नगरसेवक मातोश्रीवर भेटण्यासाठी गेले नाहीत. याची चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांची संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी निश्चितपणे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार असून शिवसेनेची ताकद आणखी वाढवण्यासाठी तुम्ही कामाला सुरुवात करा, असे निर्देश देतानाच मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचलंत का ?