कल्याण डोंबिवलीमधील ४० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या शिंदेंना शुभेच्छा | पुढारी

कल्याण डोंबिवलीमधील ४० हून अधिक नगरसेवकांनी दिल्या शिंदेंना शुभेच्छा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा; कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेच्या 59 नगरसेवकांपैकी 40 हून अधिक नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सुरुवातीला काही नगरसेवकांनी बॅनर लावून शिंदे यांना समर्थन दिले होते. काही ठिकाणी त्यांना समर्थन देण्यासाठी शक्ती प्रदर्शनदेखील करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत होते. अखेर गुरुवारी यातील अनेक नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

मात्र नेमका यांचा पाठिंबा शिंदे गटाला आहे का? यासंदर्भात विचारले असता त्यांनी आम्ही आमची भूमिका अद्यापही स्पष्ट केली नसून वेळ आल्यावर सांगितले जाईल असे सांगितले. त्यामुळे अद्यापही काही नगरसेवक ‘वेट अँड वॉच’च्याच भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. 11 तारखेला होणाऱ्या न्यायालयीन निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल असे दिसून येत असले तरी सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलेले नगरसेवक शिंदे गटात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली दिसते. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button