ठाणे महापालिका शाळेत कैद्यांना बघून मुले भेदरली… | पुढारी

ठाणे महापालिका शाळेत कैद्यांना बघून मुले भेदरली...

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोव्हीडच्या काळात विटावा येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला होता. मात्र आता शाळा सुरु झाल्यानंतरही हा कक्ष बंद करण्यात आलेला नाही.परिणामी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या समोरच कैद्यांना या विलगीकरण कक्षात आणले जात असल्याने पोलीस आणि कैदी बघून शाळेतील विद्यार्थी अक्षरशः भेदरली आहेत. शाळा हे ज्ञान दानाचे पवित्र स्थान असून या ठिकाणचा विलगीकरण कक्ष बंद करून मुलांच्या मनावर होणारा परिणाम थांबवावा, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.

कोरोनाच्या पाहिल्या आणि दुसर्‍या लाटेत ठाणे महानगरपालिकांच्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत होत्या. विटावा परीसरात असलेली 72 क्रमांकाची शाळा देखील कोविड सेंटर म्हणुन जिल्हा प्रशासनाने कोराना काळात ताब्यात घेतली होती. त्या ठिकाणी त्या शाळेचे रूपांतर कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष अश्या दोन भागात केले होते. गेल्या वर्षी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कोरोना रुग्नाची संख्या मोठी होती. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेली काळजी तसेच बाहेरून येणार्‍या नवीन कैदी अथवा न्यायबंदीला कोरोनाचा चाचणीच्या अहवाल शिवाय कारागृहात प्रवेश दिला जात नव्हता. बाहेरून येणारे नवीन कैदी अथवा न्यायबंदी (न्यायालयीन कोठडीतील आरोपी) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल तपासला जात होता, ज्या कैद्यांचे अथवा न्यायबंदी चे अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये केली जायची आणि ज्याचे अहवाल निगेटिव्ह असतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्ष येथे 14 दिवसांसाठी केली जायची, 14 दिवसानंतर विलगीकरण कक्षेतील कैदी अथवा न्यायबंदीला कारागृहात प्रवेश दिला जात होता. तेथेही काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जात होते. पॉझिटिव्ह असलेल्या कैद्यावर शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचार करून त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत ठेवले जायचे.

कच्चे कैदी ठेवण्यासाठी अद्याप वर्गांचा उपयोग

दोन वर्षानंतर कोरोनाची लाट काही प्रमाणात ओसरली आहे. परंतु विटावा येथील कैद्यांसाठी सूरू करण्यात आलेला विलगीकरण कक्ष अद्याप बंद करण्यात आलेले नाही. कच्चे कैदी ठेवण्यासाठी अद्याप या शाळेच्या वर्गांचा उपयोग जिल्हा कारागृह प्रशासनाकडून होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांचे पालक देत आहेत.

वर्ग सुरू; कैद्यांची ने-आण

एकीकडे शाळा सुरू असून या शाळेत पहिली ते सातवी इयत्ताचे वर्ग नियमित भरत आहेत. या ठिकाणीं कैदी आणि पोलिसांचा नियमित वावर पाहून बालमनावर त्याचा परिणाम असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या संदर्भात शाळेच्या वरिष्ठ शिक्षकांनी अनेकदा अर्ज विनंती करून देखील प्रशासन स्तरावर प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षक गण देखील मेटाकुटीला आले आहेत. शाळा भरण्या आणि सुटण्याच्या वेळेत या ठिकाणीं पोलिस कैद्यांची ने-आण करत असतात या संदर्भात पालकांनी देखील आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु यश येत नसल्याने पालक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

माझा मुलगा दोन वर्षांपासून या शाळेत शिकतो. मुलांच्या समोरच कैद्यांची ने आन सुरु असते. हे सर्व मुले पाहतात. गेल्या काही महिन्यांपासून हा कक्ष हलवण्यात यावा अशी मागणी पालक वर्गाकडून होत असून प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. – रेणुका बनसोडे, पालक

Back to top button