कोंडेश्वर व बारवी धरण परिसरात ‘नो सेल्फी’ | पुढारी

कोंडेश्वर व बारवी धरण परिसरात ‘नो सेल्फी’

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पर्यटनस्थळे, नदी किनारा, धबधबा येथे पावसाळ्यात होणारे दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत 31 जुलैपर्यंत धबधबा परिसरात मद्यपान करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, खोल, वाहत्या पाण्यात उतरणे व पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रसांती माने यांनी दिले आहेत.

अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर हे पर्यटनस्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचे मंदिर व धबधबे आहेत. त्याचबरोबर चांदप गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळ्याच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही वेळेस पर्यटक हे मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खोल व वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज, वर्‍हाडे, दहिवली, मळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी धरण गेट नं.3 येथील 3 किमी क्षेत्रात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

रहदारीवर परिणाम करणार्‍या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसाळ्यामुळे वेगाने वाहणार्‍या धोकादायक पाण्यात/ खोल पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्याच्यावरील बाजुस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणार्‍या पाण्याच्या झोताखाली बसणे, धोकादायक स्थिती व जिवीतहानी होईल अशा धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे, खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बादल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, अशी कोणतीही कृती केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे माने यांनी कळविले आहे.

Back to top button