

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : सावत्र मुलीचे प्रियकरा बरोबरचे प्रेमसंबंध, त्यातून होणारे वाद आणि या वादातून मुलीने फिनेल प्राशन केले. मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना याच मुलीने पोलिसांना जबाब देताना सावत्र पित्याने बलात्कार केल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे पोलिसांनी पित्याला अटक केली होती. अखेर सात वर्षानंतर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. हरणे यांनी लक्षवेधी निकाल जाहीर करताना याच पित्याची सुटका करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. विपुल नारकर (28, त्यावेळचे वय) असे बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या डोंबिवलीकराचे नाव आहे.
विपुल यांची मुंबईतल्या काळीचौकी भागात खानावळ चालविणार्या एका 34 वर्षाच्या घटस्फोटीत महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर दोघांच्या प्रेमात झाल्यानंतर विपुलने घटस्फोटीत महिलेसह तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. मात्र कालांतराने घरगुती वादातून मुलीने सावत्र वडील विपुल नारकर यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला. सावत्र पिता मोबाईलमधील अश्लिल चित्रफित दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार करत होते, अशी तक्रार या मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात मे 2015 रोजी केली. या प्रकरणात सावत्र वडील विपुल नारकर यांना अटक केली होती.