

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : एस. टी महामंडळाच्या वतीने काही समाज घटकांना प्रवासात देण्यात येणार्या स्मार्टकार्डच्या सवलतीची मुदत येत्या 31 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. मात्र, 1 सप्टेंबरपासून सध्या प्रचलित ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध पुरस्कार्थींना प्रवासात सवलत म्हणून एस. टी. महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली. सदर कार्ड काढण्यासाठी महामंडळाने 30 जून मुदत दिली होती. जुलै महिन्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असते. या यात्रेला जाणार्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्मार्टकार्ड प्राप्त करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी सध्या प्रचलित असलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल व त्यांना प्रवास करण्यास मुभा देण्यात येईल. मात्र, 1 सप्टेंबरपासून सध्या प्रचलित ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले.
महामंडळाने आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्ड त्वरित वितरण करण्याबद्दल आणि कोणत्याही लाभार्थ्याचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही, अशी सूचना आगार व्यवस्थापकांना दिली आहे. यासह स्मार्टकार्डसाठी दिलेली मुदतवाढ व ज्येष्ठ नागरिक नोंदणीकरण, आगारात प्राप्त स्मार्टकार्ड नेण्याबद्दलची सूचनाही प्रसिद्ध करावी, असे आवाहन महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना परिपत्रकाद्वारे केले आहे.