भामट्यांनी ऑनलाईन फसवणुकीचा ट्रेन्ड बदलला | पुढारी

भामट्यांनी ऑनलाईन फसवणुकीचा ट्रेन्ड बदलला

ठाणे : संतोष बिचकुले : ऑनलाईन लूट टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्यामुळे भामट्यांचे मनसुबे फोल ठरू लागले आहेत. हे लक्षात येताच या लुटारूंनी ऑनलाईन लुटण्याचा ट्रेन्डच बदलला. आता हे भामटे वीजग्राहकांना
टार्गेट करत आहेत. गेल्या 60 दिवसांत राज्यभरातील 35 वीज ग्राहकांच्या बँक खात्यांमधील लाखो रुपये भामट्यांनी ऑनलाईन लुटले असून, या प्रकरणी संबंधित जिल्हा पोलीस दलाच्या पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

काळ बदलत गेला तसे तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. पूर्वी निवडक लोकांच्या हातात असणारा मोबाईल आता प्रत्येकाकडे पाहावयास मिळत आहे. स्मार्टफोनमुळे प्रत्येक जण स्मार्ट होत आहे. बँकिंग व्यवहार असो वा ऑनलाईन खरेदी-विक्री असो… प्रत्येक सुविधा मोबाईलवर उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात घेऊन भामट्यांनी ऑनलाईन लुटण्यासाठी जाळे पसरवले. बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून सर्रासपणे खात्याची माहिती मिळवून नागरिकांची लूट सुरू झाली.

वारंवार घडणार्‍या या गुन्ह्यांचा आढावा घेऊन सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठ्या प्रमाणात लोकजागृती केली. त्यामुळे भामट्यांनी लुटण्यासाठी नवा फंडा वापरला. कोविडचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्याने आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी आर्थिकसंकट अद्यापही नागरिकांवर कायम आहे. आर्थिक टंचाईमुळे अनेक वीजग्राहक बिल वेळेवर भरत नाहीत. हे लक्षात घेऊन भामट्यांनी बोगस लिंक तयार करून वीज ग्राहकांना लुटण्याचा पर्याय निवडला आहे.

Back to top button