एक नंबर चुकला आणि महिलेने गमावले 7 लाख | पुढारी

एक नंबर चुकला आणि महिलेने गमावले 7 लाख

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : स्लिपद्वारे 7 लाख रुपये ट्रान्सफर करताना एक नंबर चुकीचा लिहिणे एका महिलेच्या अंगाशी आले. सदर रक्‍कम भलत्याच महिलेच्या बँक खात्यात जमा झाली. लॉटरी लागल्याचा समज करून त्या महिलेने 7 लाख रुपये परिचयाच्या व्यक्‍तींच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. मात्र मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्‍तालयाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सदर रक्‍कम महिलेला परत मिळवून दिली.
मीरा रोड परिसरात राहणारी पूनम खान ही 29 जून रोजी नातेवाईकांना पैसे पाठवण्यासाठी बँकेत गेली. त्यावेळी तिने स्लिपद्वारे नातेवाईकांचा नंबर लिहिला. मात्र नंबर चुकीचा असल्याने नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी भलत्याच बँक खात्यात जमा झाले. पूनम हिने नातेवाईकांना स्लिपचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला.

दरम्यान, खात्यात पैसे जमा न झाल्याने पूनमने पुन्हा बँक गाठली. बँकेच्या कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता पूनमने बँक अकाऊंटचा एक नंबर स्लिपवर चुकीचा लिहिल्याचे स्पष्ट झाले. अखेर पूनमने सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सपोनि स्वप्नील वाव्हळ, पोउपनि प्रसाद शेनोळकर, अंमलदार प्रवीण आव्हाड, गणेश इलग, माधुरी, धिंडे, सुवर्णा माळी या पोलीस पथकाने तात्काळ तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान, 7 लाख रुपये मुंबईतील मुलुंड येथे राहणार्‍या पटेल नावाच्या महिलेच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्या महिलेसोबत पोलिसांनी संपर्क साधला असता लॉटरी लागल्याचे महिलेने सांगितले. पोलिसांनी सर्व हकीगत सांगितल्यानंतर पटेल हिने सदर रक्‍कम पुन्हा पूनम खान हिच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बँकिंग व्यवहार करताना सावधपणे केले पाहिजेत. एक नंबरही चुकीचा टाकल्याचे पैसे भलत्याच खात्यात जमा होतात. त्यामुळे बँक खाते क्रमांकाची पडताळणी करूनच पैसे ट्रान्सफर करावे, अन्यथा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल, हे नागरिकांनी कायम
लक्षात ठेवले पाहिजे.

Back to top button