आठ तास बत्तीगुलमुळे डोंबिवलीकर घामाघूम | पुढारी

आठ तास बत्तीगुलमुळे डोंबिवलीकर घामाघूम

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी उसंत घेतली. मात्र अचानक सकाळी 7 वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्यामुळे डोंबिवलीकर घामाघूम झाले होते. तांत्रिक बिघाड झाल्याचे वीज महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले. दुपारी 2 वाजता काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. तब्बल 8 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात विजेचा लंपडाव सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच आगीत तेल पडणारी घटना घडली. स्टेशनजवळील हेवीवेट ट्रान्सफॉर्मरचे बांधकाम कोसळल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला.

डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली, गोग्रासवाडी, रॉकेल डेपो, संत नामदेव पथ, जिजाईनगर आदी भागांत शनिवारी सकाळी सात वाजता वीजपुरवठा खंडित झाला. या भागातील सामाजिक कार्यकर्ते अनिल ठक्‍कर यांनी महावितरण कंपनीच्या डोंबिवलीतील कार्यालयात संपर्क केला. वीज पुरवठा पूर्ववत होण्यास पाच-सहा तास लागतील, असे त्यांना उत्तर मिळाले. याबाबत महावीज वितरण कंपनीचे अभियंता गायकवाड यांना संपर्क केला असता ते म्हणाले, सदर भागातील तीन-चार ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर्समध्ये तांत्रिक बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम चार-पाच तासांत होईल, असेही सांगितले. सकाळी सात वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी चार वाजता पूर्ववत झाला.

त्यातच तर मुसळधार पावसामुळे डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात असलेल्या ट्रान्सफॉर्मर्सचे बांधकाम कोसळल्याने स्टेशन आणि आजूबाजूकडील परिसरात बत्तीगुल झाली होती. बाजीप्रभू चौकातील हेवीवेट ट्रान्सफॉर्मर्सचे बांधकाम कोसळसल्यामुळे या दोन्ही ट्रान्सफॉर्मर्सचे मोठे नुकसान झाले. परिणामी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत बाजीप्रभू चौकातील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी. टी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जुन्या एसटी स्टँडजवळील हेवीवेट असलेल्या दोन ट्रान्सफॉर्मर्सच्या माध्यमातून या भागाला वीज पुरवठा केला जातो.

मुसळधार पावसाचा फटका

शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे सदर ट्रान्सफॉर्मर्सचे बांधकाम अचानक कोसळले. त्यामुळे हे ट्रान्सफॉर्मर्सही खाली आले. या घटनेमुळे महावितरणचे नुकसान झाले. रात्री पाऊस कमी झाल्यावर तुटलेल्या ट्रान्सफॉर्मर्सवरील विद्युत वाहिनीचा लोड अन्य ट्रान्सफॉर्मरवर शिफ्ट करण्यात आला. शनिवारी सकाळी याचे काम करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. परिणामी बाजीप्रभू चौकातील वीजग्राहकांना काही तास विजेच्या समस्येला सामोरे जावे लागले. दरम्यानप, दुपारी चार वाजल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला.

Back to top button