कोकणात मंत्रीपदासाठी रस्सीखेच | पुढारी

कोकणात मंत्रीपदासाठी रस्सीखेच

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेचे सर्वाधिक आमदार शिंदे गटाकडे गेल्याने मंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच कोकणात पहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातून मूळ भाजपचे असलेले नितेश राणे आणि बंडखोर गटातील दीपक केसरकर यांच्यात स्पर्धा आहे, तर रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांमध्ये स्पर्धा आहे.

रायगडमध्ये भरत गोगावले यांचे मंत्रीपद निश्‍चित मानले जात असले तरी भाजपचे प्रशांत ठाकूर यांचे नावही चर्चेत आहे. ठाण्याला पहिल्यांदा एकनाथ शिंदेंच्या रूपाने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र या जिल्ह्यातही बंडखोर गटाकडून प्रताप सरनाईक आणि डॉ. बालाजी किणीकर यांच्या मंत्रीपदासाठी स्पर्धा आहे, तर भाजपकडून आमदार संजय केळकर, किसन कथोरे, रवींद्र चव्हाण या तीन नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. मुंबईत आशीष शेलार यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. मात्र बंडखोर गटाकडून सदा सरवणकर यांच्या नावाची चर्चा आहे. याचबरोबर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कालीदास कोळंबकर यांना यावेळी मंत्रीपदाची संधी मिळणार का? याकडे लक्ष आहे.

मुंबईत एकूण 36 आमदारांचे कार्यक्षेत्र आहे. यामध्ये भाजपचे 15 आमदार आहेत. शिवसेना बंडखोर गटाकडे 4 आमदार आहेत. तर ठाण्यात 18 आमदारांपैकी भाजपकडे 7 आमदार आहेत. शिंदे यांच्या गटाकडे 6 आमदार आहेत. तर पालघर जिल्ह्यात शिंदे गटात 1 आमदार तर भाजपला सहकार्य करणार्‍या बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदार आहेत. बहुजन विकास आघाडी यावेळी मंत्री पदासाठी आग्रही आहे. त्यामुळे कुणाला मंत्रीपद द्यायचे यावरुन रस्सीखेच सुरू आहे.

कोकणातील उदय सामंत तसेच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत. भुसे हे नाशिकचे असले तरी त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. त्यामुळे त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष आहे. पालघरचे पालकमंत्रीपद हे बहुजन विकास आघाडी आपल्याकडे मागणार असल्याने या जिल्ह्यातही मंत्रीपदासाठी रस्सीखेच असेल. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद 2014 च्या सेना -भाजपच्या फॉर्म्युल्यामध्ये भाजपकडे होते. यावेळी रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री होते. आता शिंदे गटाचा रायगडवर दावा असल्याने येथेही दोघांमध्ये रस्सीखेच होईल.

Back to top button