प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी होणार | पुढारी

प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी होणार

बदलापूर : पुढारी वृत्तसेवा :  1 जुलैपासून एकल प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात प्रतिबंधित प्लास्टिकची, साठवणूक, विक्री आणि वापर करणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. बदलापूर, कल्याण, डोंबिवलीसह ठाणे शहरातील एकल प्लास्टिक वापर बंद करण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाने विविध माध्यमांतून व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना प्लास्टिक बंदीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

बदलापूर येथे महापालिकेने घेतलेल्या बैठकीत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी एकल प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत. बाबासाहेब कुकडे यांनी प्रतिबंधित प्लास्टिक वस्तू आणि साहित्य विषयीचे सादरीकरण केले, तर एकल वापर प्लास्टिक उत्पादने व वस्तूंचे निर्मूलन करण्यासाठी नागरिक व व्यापारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले. या बंदीमुळे ठाण्यात दुकानदारांनी प्लास्टीक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांवर भर दिला.

दुकानांमध्ये होणार तपासणी

महापालिकेच्या शोध पथकामार्फत बाजारपेठ, प्लास्टिक वितरक, दुकाने फेरीवाले, व्यापारी आस्थापना याठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकबाबत तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईत प्लास्टिक व थर्माकोल आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिकचा साठा असल्यास व्यावसायिकांनी याची माहिती नगर पालिकेला द्यावी,असे आवाहन मुख्यधिकार्‍यांनी केले.

अशाप्रकारे असेल दंड

पहिल्या गुन्ह्यात 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसर्‍या गुन्ह्यात दुप्पट म्हणजे 10 हजार रुपये दंड आकारला जाईल. तिसर्‍या गुन्ह्यात दंडाची रक्कम थेट 25 हजार असेल व 3 महिन्यांच्या कारावासाचीही तरतूद असेल.

Back to top button