बदलापूरात अडथळ्यांच्या शर्यतीत आणखी एक अडथळा | पुढारी

बदलापूरात अडथळ्यांच्या शर्यतीत आणखी एक अडथळा

बदलापूर : पंकज साताळकर :  बदलापूर पूर्वेला असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर जाण्यासाठी रेल्वेने आणखीन एक अडथळा निर्माण केला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर जाण्यासाठी बदलापूरात कुठूनही प्रशस्त असा रस्ता नाही. तिकीट खिडकी सोडली तर कुठूनही थेट बाहेर निघण्यासाठी रस्ता नसल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना आणि तिथून बाहेर निघताना बदलापुरातील प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबई दिशेला प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर बाहेर पडण्यासाठी असलेली जागा ही निमूळती आहे. तसेच मध्यभागी असलेल्या पुलाखालील जागेतही रेल्वेने रेलिंग उभारून रस्ता अडवला आहे. इतकेच नाही तर कर्जत दिशेला देखील रस्ता यापूर्वी निमुळता होता. अनेक दुचाकी धारक हे आपली वाहने थेट स्टेशन पर्यंत नेत असल्याने रेल्वेने या ठिकाणी खांब उभारून अडथळा निर्माण केला होता. आता मात्र कहर करून या ठिकाणी थेट पत्रा लावून चालत येण्याजाणार्‍या प्रवाशांचा देखील रस्ता रेल्वेने अडवला आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहे. आधीच पावसाळा असल्यामुळे व स्टेशनवर जाण्यात अनेक अडथळे पार करून जावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

पार्किंग ठेकेदार आणि इतर काम सुरू असलेल्या ठेकेदारांची तळी उचलण्यासाठीच रेल्वेने अशा प्रकारे अडथळा निर्माण केल्याने प्रवाशांमधून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलापुरातील प्रवाशांचा उद्रेक हा इतिहासात नोंद झाल्याचा विसर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पडल्यामुळे पुन्हा एकदा तोंडावर आपटल्यानंतरच आणि प्रवाशांनी उग्र आंदोलन छेडल्यानंतरच हा अडथळा दूर करणार का ? असा संताप्त सवाल बदलापुरातील रेल्वे प्रवासी विचारत आहेत.

भिंत तोडण्यासाठी खासदारांनी संसदेत शून्य प्रहरात मांडला होता मुद्दा

स्कायवॉकची उभारणी झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर मुंबई दिशेकडे असलेल्या महिला डब्याच्या इथून स्टेशनवर प्रवेश करताना रेल्वे प्रशासनाने भिंत टाकून प्रवाशांसाठी हा मार्ग बंद केला होता. तेव्हा देखील संताप्त झालेल्या बदलापूरकरांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र मग्रुर रेल्वे प्रशासनाने ही भिंत पाडण्यास नकार दिला. त्यानंतर स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी याबाबत संसदेत शुन्य प्रकारात मुद्दा मांडल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी ही भिंत काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे रेल्वे अधिकार्‍यांच्या मग्रुरीविरोधात प्रवाशी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

Back to top button