राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्याची समीकरणे बदलणार | पुढारी

राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्याची समीकरणे बदलणार

ठाणे : प्रवीण सोनावणे : राज्यातील सत्तांतरानंतर आता भविष्यात होऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणे देखील बदलणार आहेत. राज्यात ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूका देखील भाजप आणि शिंदे गट एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत. परिणामी आतापर्यंत ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येत असताना पालिकेच्या निवडणुकीनंतर मात्र शिंदे गटाला ठाणे पालिकेच्या सत्तेत महत्वाचा वाटा द्यावा लागणार आहे, एवढे निश्चित मानले जात आहे.

नऊ दिवसांच्या राजकीय महानाट्यानंतर अखेर राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले आहे. यामध्ये अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेनेपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही पक्षश्रेठींच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. विकासकामांना निधी मिळत नसून राज्यातील सर्व निधी हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी फारकत घेत शिवसेनेचे आमदार फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यामुळे आता राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असून याचा परिणाम ठाण्याच्या राजकारणावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे महापौरांसह पालिकेतील महत्वांच्या पदावर देखील शिवसेनेच्याच नगरसेवकांनी आतापर्यंत वर्णी लागत आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आगामी ठाणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढवावी अशी मागणी राष्ट्रावादीकडून होत होती. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका निवडणुक राष्ट्रावादी आणि शिवसेनेने एकत्र लढवण्याची इच्छा व्यक्त
केली होती.

शिवसेना मात्र सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवण्यास तयार नव्हती. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी तर मिशन शिवसेना अशी घोषणा करून पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे ठाण्यातही शिवसैनिक हे राष्ट्रवादी सोबत जाण्यास इच्छुक नव्हते हे आधीच स्पष्ट झाले होते.

ठाणे महापालिकेत सर्वाधिक 67 नगरसेवकांचे संख्याबळ हे शिवसेनेकडे होते.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या 24 होती. ठाण्यात काँग्रेसची ताकद नगण्य आहे. राज्यातील या सर्व राजकीय घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट असा संघर्ष निर्माण झाला असला तरी, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य आहे. तर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट असे सरकार असल्याने ठाण्यात सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला मात्र यामुळे सत्तेत महत्वाचा वाटा मिळण्याची दाट
शक्यता आहे.

Back to top button