

खानिवडे : पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्याला एक समग्र ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने, पद्स्पर्शाने पुनीत झालेल्या या जिल्ह्यात आजही अनन्य साधारण महत्व प्राप्त असलेला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्तता मिळवून देणारा नरवीर चिमाजी आप्पांच्या वसई रणसंग्राम विशेष आहे. अशा या ऐतिहासिक वारशांच्या पालघर जिल्ह्यातील जंजिर्याची, किल्ल्यांची, गडांची, गडकोटांची, गढीची तसेच कोटांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे दुर्गमित्रांसह इतिहासप्रेमींमध्ये नाराजी आहे. पुरातत्व विभागाने ऐतिहासिक वारशांचे जतन करावे असे साकडे त्यांनी घातले आहे.
पालघर जिल्ह्यातील गडकोटांची वाढती दुरवस्था पाहता गडकोटांच्या पर्यटन, संवर्धन अस्तित्वासाठी ठोस व कार्यशील यंत्रणा आजही अस्तित्वात नाही. ती कार्यरत होईल तोपर्यंत अनेक स्थळे पूर्णपणे नामशेष झालेली असतील. जिल्ह्यातील दुर्गमित्र करत असलेले संवर्धन कार्य गडकोटांवरील स्थळे स्वच्छता ह्या मर्यादित स्वरूपाच्या असून मुख्य स्थळांची डागडुजी न झाल्याने सर्वच भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. भुईकोट व जलदुर्ग ऐतिहासिक स्थळे प्री -वेडिंग, दारुबाजांचे धिंगाणे, प्रेमीयुगलांचे असभ्य वर्तन, विना परवाना छायाचित्रण, प्लास्टिक कचरा वाढ, गडावरील मंदिरे व तोफांची दुरवस्था, गडावरील व परिसरातील मूर्त्यांची चोरी व विद्रुपीकरण, गडाच्या जागेवर खासगीकरण हे प्रश्न अत्यंत वेगाने वाढत असून ऐतिहासिक वारशांसाठी हि गणवीर बाब असल्याचे दुर्गमित्र व इतिहासप्रेमी सांगत आहेत.
पालघर जिल्ह्यातील लहान मोठे गडकोट पाहता त्यांची संख्या 50 हुन अधिक आहे. यातील राज्य पुरातत्व मुंबई रत्नागिरी विभाग व केंद्रीय पुरातत्व सायन विभाग यांच्या संरक्षित स्मारकात फक्त 3 किल्ले नोंदवलेले आहेत. यात जंजिरे वसई किल्ला, जंजिरे अर्नाळा किल्ला, शिरगाव कोट अंतर्भूत होतात. याशिवाय वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणार्या दुर्गांची संख्या अधिक असली तरीही प्रत्यक्षात वनविभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारकात किंवा संवर्धनासाठी जिल्ह्यातील एकही किल्ला नाही.
पालघर वनविभागाने जिल्ह्यातील भवानगड, तांदुळवाडी, काळदुर्ग, आशेरीगड यावर कचराकुंडी, मोजक्या पायर्या, लोखंडी रेलिंग अशा काही सुविधा केल्या असल्या तरीही त्याने मुख्य गडाचे वा दुर्गाचे काहीही संवर्धन झालेले दिसून येत नाही. दुर्गमित्रांच्या स्वच्छता मोहिमांमध्ये जमा होणारा दारूच्या बाटल्यांचा खच व प्लास्टिक कचरा चिंताजनक आहे. यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना व व्यवस्थेची मागणी होतेय.
जिल्ह्यातील सर्वच ऐतिहासिक गडकोटांवर कायमस्वरूपी ठोस पोलीस यंत्रणा कार्यरत होणे अत्यंत गरजेचे असल्याचे दुर्गमित्रांचे म्हणणे आहे. यात प्रामुख्याने आशेरीगड (खडकोना गाव), जंजिरे वसई किल्ला (वसई गाव), जंजिरे अर्नाळा किल्ला (अर्नाळा बेट), तांदुळवाडी दुर्ग (तांदुळवाडी गाव सफाळे), शिरगाव कोट (शिरगाव गाव), काळदुर्ग किल्ला (वाघोबा खिंड) यावर अत्यंत जलदगतीने पोलीस प्रशासन, पुरातत्व विभाग, वनविभाग अंतर्गत पर्यटक तपासणी केंद्र नेमणे आवश्यक आहे. एके ठिकाणी दुर्गमित्र स्वखर्चाने व अत्यंत कष्टाने गडकोटांवर संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी मोहिमा आयोजित करत आहेत, तर दुसर्या बाजूने स्वच्छ करण्यात आलेल्या ऐतिहासिक जागा दारुड्यांच्या व प्रेमीयुगलांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बळी पडत आहेत.