मुंब्य्रात नकली नोटांचा कारखाना उद्ध्वस्त | पुढारी

मुंब्य्रात नकली नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  मुंब्य्रात नकली नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे तर या गुन्ह्याचा मास्टर माईंड असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हा मुलगा घरातच 100, 200 व 500 रुपयांच्या नोटा छापत होता. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नोटा छपाई करण्याचे साहित्य व नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

एक जण बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांच युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंब्रा बायपास रोड, येथे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोहम्मद जैद चांदबादशाह शेख (25, रशीद कम्पाउंड, मुंब्रा) याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ शंभर रुपये दराच्या 250 नोटा मिळून आल्या. अटकेतल्या व्यक्तीची कसून चौकशी केली असता त्याने या नोटा एका 17 वर्षीय युवकाकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सदर 17 वर्षीय मुलाच्या मुंब्रा येथील घरी छापा मारून तपासणी केली असता तेथे बनावट नोटा छपाईचे साहित्य मिळून आले.

पोलिसांनी एक लॅपटॉप, कटिंग केलेल्या 100 रुपयांच्या नकली नोटा, नकली नोटांचे चित्र व पेपर्स, कटर, नोटांचे कोरे पेपर्स, 500 रुपयांच्या नोटांचे चित्र व पेपर्स असे साहित्य जप्त केले आहे. नोटा छपाई
करणार्‍या युवकास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने मोठ्या प्रमाणात नकली नोटा छापून त्या चलनात आणल्या असाव्यात असा संशय असून पुढील तपास गुन्हे शाखेचे पथक करीत आहे. अशी व्हायची नकली नोटांची डील कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता अल्पवयीन मुलाने 500 व 200 रुपयांच्या नोटांचे चित्र पाण्यात टाकून पुरावा नष्ट केले.

या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शेख याची चौकशी केली असता त्याने नकली नोटांच्या डीलबाबत माहिती दिली. अल्पवयीन मुलगा 10 हजार रुपयांच्या मोबदल्यात 20 हजारांच्या नकली नोटा देत होता. सदर नोटा शेख चलनात आणत होता. या मुलाने अशा प्रकारे किती नोटा छापल्या आहेत. याचा पोलीस तपास करत आहेत.

3 एटी 511001 असा या नकली नोटांचा सीरियल नंबर

या घटनेत गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या सर्व नकली नोटांवर एकच सिरीयल नंबर असल्याचे आढळून आले आहे. 3 एटी 511001 असा या नकली नोटांवरचा सिरीयल नंबर आहे. या एकाच सिरीयल नंबरच्या अनेक नकली नोटा आरोपींनी चलनात आणल्या असाव्यात असा पोलिसांना संशय असून त्या दिशेने गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button