प्रशासनाविरुद्ध गांधीगिरी : रिक्षाचालकांनीच श्रमदानातून खड्डे भरले | पुढारी

प्रशासनाविरुद्ध गांधीगिरी : रिक्षाचालकांनीच श्रमदानातून खड्डे भरले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागातील बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सांगूनही डोंबिवली पश्चिमेतील खड्डे भरणीची कामे केली जात नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या डोंबिवली पश्चिमेतील रिक्षाचालकांनी सोमवारी सकाळी अर्धा वेळ रिक्षा बंद ठेऊन रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे केली.  कोट्यवधीचा अर्थसंकल्प असलेल्या पालिककडे खड्डे भरण्यासाठी निधी नाही का, आदी प्रश्न रिक्षाचालकांनी केलेल्या खड्डे भरणीचा प्रकार पाहून प्रवासी, पादचारी उपस्थित करत होते.

सततच्या वर्दळीमुळे, पावसाने खडी-माती निघून गेल्याने रिक्षाचालकांसह प्रवाश्यांना या खड्डयांचा त्रास होत आहे. खड्ड्यात प्रवासी बसलेली रिक्षा आपटून रिक्षाचा आस तुटण्याची भिती असते. रिक्षाचे इतर भागही खिळखिळे होत आहेत. एखादा भाग तुटला की त्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांचा फटका बसतो. डोंबिवली पश्चिमेतील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी अनेक वेळा बांधकाम अधिकार्‍यांकडे केली. त्याची दखल घेतली जात नाही. फक्त खड्डे भरण्याच्या कामाचे आदेश झाले नाहीत, अशी उत्तरे देतात. बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याची कामे वेळेत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी श्रमदानातून खड्डे भरण्याची निर्णय घेण्यात आला, अशी माहिती रिक्षा चालक-मालक संघटनेचे शेखर जोशी यांनी दिली.

पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याची कामे पूर्ण करण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये शहर अभियंता विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. शहर अभियंत्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. पावसाळापूर्वी खड्डे भरण्याच्या कामांचे प्रस्ताव अद्याप निविदा प्रक्रियेत अडकले आहेत. या कामासाठी ठेकेदार नियुक्त केले नसल्याने प्रभागांतील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना प्रवासी, रिक्षा, खासगी वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावरील चर्‍या, खड्डे माती, खडी टाकून तात्पुरती बुजविण्याची कामे सद्या करण्यात येत आहे. प्रवासी वाहतूक थांबवून 30 रिक्षाचालकांनी खडी, माती आणली. ती महात्मा फुले रस्ता, ह प्रभाग, उमेशनगर, विजयनगर भागातील रस्ते माती, खडीने भरले.

लेट लतिफ प्रशासनाचे चटके प्रवासी व रहिवाशांना

ह प्रभाग कार्यालयासमोर रिक्षाचालक जमा झाले. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय पालिकेसमोरून न हटण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी घेतला. ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील हे रिक्षाचालकांना सामोरे गेले. पाटील यांनी रिक्षाचालकांनी आणलेल्या मोर्चाची माहिती आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांना कळविली. शहर अभियंता विभागात नस्ती मंजूर होण्याची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने त्याचे चटके प्रवासी व रहिवाशांना बसतात, अशी दबक्या आवाजात अधिकारी चर्चा करत आहेत. अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर डोंबिवली पश्चिम विभागातील खड्डे भरणीची कामे येत्या सहा दिवसात पूर्ण केली जातील. यासंदर्भात बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना कळविण्यात आले असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले.

खड्ड्यांमुळे भूर्दंड वाढला

खड्ड्यांमध्ये रिक्षा सतत आपटून रिक्षा खराब होते. प्रवासी वाहतूक करत असताना रिक्षा बंद पडते. या सततच्या खड्ड्यातील आदळआपटीमुळे रिक्षा चालकांना आठवड्यातून दोन ते तीन हजार रुपये दुरुस्तीसाठी खर्च करावे लागतात. येत्या सहा दिवसांत खड्डे भरणी केली नाही तर मात्र पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष शेखर जोशी यांनी या संदर्भात बोलताना दिला.

Back to top button