महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता? | पुढारी

महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता?

नालासोपारा : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई- अहमदाबाद महा मार्गावरील नैसर्गिक नाल्यावर भराव केल्याने महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेने यावर्षी 100 टक्के नालेसफाईची दावा केला आहे. पण या भूमाफियांनी नैसर्गिक नाल्यावरच भरणी करून जागा हडपण्याचा डाव आखला आहे. यामुळे पावसाळ्यात महामार्ग पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई -विरार महानगर पालिकेने यावर्षी मोठ्याप्रमाणात यांत्रिक पद्धतीने नाले सफाई केली आहे. त्यात पालिकेने शहरातील आणि शहराला जोडणारे मुख्य नैसर्गिक नाले 100 टक्के साफ केल्याची माहिती दिली आहे. असे असले तरी काही ठिकाणी भूमाफियांनी पालिकेने नालेसफाई केल्यानंतर पुन्हा नाले बुजविण्याचे काम सुरू केले आहे. असाच प्रकार मुंबई-अहमदाबाद महामागार्गावर कामण खाडी पुलाजवळ असलेल्या मालाजीपाडा परिसरात आढळून आला आहे. येथील नैसगिक नाला काही दिवसापूर्वीच पालिकेने साफ केला असल्याची माहिती पालिकेने दिली होती.

परंतु स्थानिक भूमाफियांनी पालिकेचे काम झाल्यानंतर पुन्हा हा नाला बुजविण्याचे काम केले असून. या ठिकाणी असलेल्या कांदळवनाची झाडे नष्ट करून नाल्यावर भराव करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या परिसरात पावसाळ्यात पुन्हा पुराचा फटका सहन करावा लागणार आहे.

Back to top button