एकनाथ शिंदे समर्थकांचे पुन्हा शक्तिप्रदर्शन | पुढारी

एकनाथ शिंदे समर्थकांचे पुन्हा शक्तिप्रदर्शन

ठाणे: पुढारी वृत्तसेवा :  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे याचिकेत नमूद केल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे समर्थकांनी पुन्हा शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाची सेना हीच खरी सेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा केला.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत दिलासा दिल्याने समर्थकांनी जल्लोष केला.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी करीत महाविकास आघाडी सरकारला नव्हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेना खरी कुणाची बाबत प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेसवर बंडाचे खापर फोडत शिंदे यांनी सरकारला हादरा दिला आहे. आसाम मधील बंडखोर आमदारांच्या जिवंत बॉड्या राज्यात परत येतील, असे वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर ठाण्यातील शिंदे समर्थक आक्रमक झाले. शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे, शाखा प्रमुख बबन मोरे यांनी दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम कार्यालयात सर्वांना जमा होण्याचे आवाहन केले आणि शेकडो शिवसैनिक जमा झाले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे उपस्थित होते. ते सर्व जण दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन खर्‍या शिवसेनेला ताकद देण्याची प्रार्थना केली. यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले, आमचीच खरी शिवसेना असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल. संजय राऊत यांच्या पायाखालील वाळू घसरल्याने ते बॉडी परत येतील असे बोलत आहेत. ते आमदार कुणाचे वडील, कुणाचे पती कुणाचे बाबा, काका आहेत, याचे भान ठेवावे, असे बोलून शिंदे यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नसून ते केवळ फिल्मी डायलॉग मारत आहेत. सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास असून आमचाच विजय होईल. तसेच संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे.
-डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

Back to top button