हो मी गद्दार आहेे, किणीकरांविरुद्ध फलक

हो मी गद्दार आहेे, किणीकरांविरुद्ध फलक

अंबरनाथ : पुढारी वृत्तसेवा :  एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीमध्ये असल्याने सुरवातीपासूनच किणीकर सोशल मीडियावर ट्रोल होत असताना, आता त्यांच्या बाबतचा विरोध समोर येऊ लागला असून त्यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये विविध भागात हो, मी गद्दार आहे अश्या आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर पोलिसांनी काढून ताब्यात घेतले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी बोलताना सांगितले.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्याने राज्य सरकारचे सिंहासन डगमगले आहे. त्यामुळे शिवसेनेतच दोन गट पडल्याने सर्वसामन्य शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसा संभ्रम अंबरनाथमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अंबरनाथमधील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, रवींद्र करंजुले, सुनील सोनी अश्या काहींनी उघडपणे एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन त्या आशयाचे फलक देखील लावले. तर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी मात्र सावध भूमिका घेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे आमचे नेते आहेत.

हे दोघे एकत्र राहायला हवेत असे बोलून सध्या वेट अँड वॉचची भुमिका घेतली आहे. त्यात अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातील टोकाचे मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे किणीकर यांच्या विरोधात लागलेले फलक सर्वसामान्यांनमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. याबाबत आमदार किणीकर यांनी मात्र सध्या कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसून वेळ आल्यावर व्यक्त होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. मात्र शहरात किणीकर यांच्या विरोधातील फलकाने शहरातील वातावरण काहीसे तणावाचे झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news